Saturday, May 11, 2024
Homeधुळेजिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव नाही

जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव नाही

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. तरी पशुसंवर्धन विभागासह संबंधित विभागांनी सतर्क राहत दक्षता बाळगावी.

- Advertisement -

वनविभाग, सिंचन विभागाने स्थलांतरीत पक्ष्यांवर लक्ष्य ठेवावे. मृत पक्षी आढळून आल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.

त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक एम. एम. भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र लंघे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. यादव म्हणाले की, धुळे जिल्ह्याच्या शेजारील मध्यप्रदेश व गुजरात या राज्यात काही भागात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यातील वनविभागाच्या क्षेत्रात किंवा सिंचन प्रकल्पांवर स्थलांतरीत पक्ष्यांचे वास्तव्य असू शकते.

अशा ठिकाणी पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष द्यावे. या भागात पक्षी मृत आढळून आल्यास त्याची माहिती तत्काळ द्यावी. त्यासाठी गावागावांत विविध माध्यमांद्वारे जनजागृती करावी. माहिती मिळाल्यावर पशुसंवर्धन विभागाने मृत पक्षाचे नमुने घेवून त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

धुळे जिल्ह्याच्या सीमांवर कुक्कुटवर्गीय पक्ष्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करावी. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पथकांची नियुक्ती करावी. आवश्यक तेथे पोलिसांची मदत घ्यावी. बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आल्यास केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तत्काळ कार्यवाही करावी.

त्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. आरोग्य विभागाने आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या पथकांना पीपीई किटसह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. महापालिकेने कोंबडीचे मांस विक्रेत्यांना दक्षतेच्या सूचना द्याव्यात. तसेच कोंबड्यापासून मांस तयार करतांना निर्माण होणारे अवशेष उघड्यावर टाकू नये. त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना द्याव्यात, असेही निर्देश श्री. यादव यांनी दिले.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विसावे म्हणाले की, बर्ड फ्ल्यू प्रतिबंधक उपाययोजना म्हणून 18 रॅपिड रिस्पॉन्स टीम तालुकानिहाय गठित करण्यात आल्या आहेत. पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांना दैनंदिन अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या