Friday, April 26, 2024
Homeनगरअन्य रोगांसोबत लम्पी ठरतोय अधिक घातक

अन्य रोगांसोबत लम्पी ठरतोय अधिक घातक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माणसांना होणार्‍या कोविड प्रमाणेच जनावरांना होणारा लम्पी स्किन रोग हा अन्य रोगांच्या लागणीमुळे अधिक घातक असल्याचे समोर आले आहे. यामुळे पशूसंवर्धन विभागाची डोकेदुखी वाढली असून लम्पीसोबत होणार्‍या अन्य रोगावर प्रभावी लसीकरण करण्याचा निर्णय पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असून जिल्ह्यात 34 गावात लम्पी बाधित जनावरे सापडले असून बाधितांची संख्या देखील 135 वर पोहचली आहे.

- Advertisement -

माणसांना आधी असणार्‍या आजारात कोविडची लागण झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांची परिस्थिती गंभीर होत होती. तशीच स्थिती आता जनावरांमध्ये अन्य रोगांच्या लागणीदरम्यान लम्पी झाल्यास होतांना दिसत आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यातील डोर्‍हाळे या गावात 15 दिवसांपूर्वी हरियाणा येथून आणलेल्या गायीचा लम्पी आणि अन्य रोगाच्या लागणीमुळे सोमवारी मृत्यू झाला असल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

यामुळे पशूसंवर्धन विभागाने आता गुंतागुंतीच्या लम्पीग्रस्त जनावरांवर उपचार करण्यासाठी राज्याच्या विविध भागातील जनावरांचे मोठे रुग्णालय, प्रयोग शाळा यांच्याकडून मार्गदर्शन घेत उपचार पध्दतीन ठरवत आहे. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक जनावराचा वैद्यकीय अभ्यास करून, नव्याने लागणार होणार्‍या जनावरांना अन्य रोगाची लागण झालेली आहे का अथवा उपचार सुरू आहेत का? याची माहिती घेण्यात येत आहे, त्यानूसार उपचारांची पुढील दिशा ठरवण्यात येत आहे. यासह बाधित गावातील पाच किलो मीटर परिघात जनावरांचे लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

जिल्ह्यात सोमवार (दि.5) अखेर 34 ठिकाणी जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. यात अकोले 2, राहुरी 5, श्रीरामपूर 3, नेवासा 1, कर्जत 5, पारनेर 3, पाथर्डी 1, संगमनेर 4, जामखेड 3, श्रीगोंदा 2, कोपरगाव 1, शेवगाव 1 आणि राहाता 3 यांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 135 जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. जिल्ह्यात लम्पीची बाधा झालेल्या पाच किलो मीटरच्या परिघातील 138 गावातील 1 लाख 88 हजार 992 जनावरांचे लसीकरण पशूसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत 76 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून सध्या 1 लाख 12 हजार 200 लम्पी प्रतिबंधात्मक लस जिल्ह्यात उपलब्ध आहे.

जनावरांना होणार लम्पी स्किन रोग हा जनावरांसाठी संसर्गजन्य आहे. माशा, डास, चिल्टे, गोचिड, गोमाशी यामुळे त्याचा झपाट्याने फैलाव होत असल्याने पूशसंवर्धन विभागाच्या सल्ल्याने आठ दिवसांतून दोन जनावरांचा गोठा स्वच्छ करावा, फॉगिंग करावी, औषध फवारणी करावी, असे आवाहन पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी केले आहे.

नगरसह राज्य लम्पीग्रस्त जनावरांची संख्या वाढत आहे. नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे लक्ष ठेवून असून बाधित भागातून जनावरांची वाहतूक बंदीसह 10 किलो मीटर परिघात जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहे. लम्पीला मज्जाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या