Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसहा वर्षाच्या मुलाचा नरबळी : आरोपींना जन्मठेप

सहा वर्षाच्या मुलाचा नरबळी : आरोपींना जन्मठेप

उस्मानाबाद –

आत्म्याला शांती मिळावी म्हणून सहा वर्षांच्या मुलाच्या नरबळी दिल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सहा आरोपींना

- Advertisement -

जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कळंब तालुक्यातील पिंपळगावात 2017 साली सहा वर्षीय कृष्णा इंगोले या चिमुकल्याचा नरबळी देण्यात आला होता. हे प्रकरण राज्यात मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. या प्रकरणात चिमुकल्याच्या सख्ख्या आत्यासह चुलता, चुलती, आजोबा आणि पुण्यातील एका मांत्रिकाला अटक करण्यात आली होती. साडे तीन वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात विविध साक्ष, युक्तीवाद झाला. अखेर शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी देशपांडे यांनी निकाल दिला.

26 जानेवारी 2017 ला मयत कृष्णा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून शाळेतून त्याच्या पिंपळगाव (डोळा) येथील घरी आला. घरी आई नसल्याने तो घराबाहेर खेळत होता. मात्र नंतर तो अचानक गायब झाला. दिवसभर शोधूनही तो न सापडल्याने मयत कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. दुसर्‍याच दिवशी म्हणजे 27 जानेवारी 2017 ला सकाळी 11 च्या सुमारास शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला. याचा तपास कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक डी. डी. बनसोडे यांनी केला. त्यानंतर हा तपास पोलीस निरिक्षक सुनिल नेवसे यांनी केला.

या प्रकरणी केलेल्या तपासात मयत कृष्णाची सख्खी आत्या द्रोपदी पौळ हिने त्याला बोलावून घेतल्याचे समोर आले. त्याला आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील विहीरीवर दाट झाडीत घेऊन गेली. त्याच ठिकाणी आरोपी द्रोपदी हिने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा खून करुन नरबळी दिल्याचे उघड झाले. आरोपी उत्तम इंगोले याची मयत चुलत बहिण कडुबाई तसेच आरोपी साहेबराव इंगोले यांची मयत पत्नी यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचा आत्मा भटकू नये असे कारण देण्यात आले होते.

आत्म्याला शांती मिळावी यासाठी रक्ताच्या नात्यातील मुलाचा नरबळी द्यावा लागेल असे पुणे येथील मांत्रीक आरोपी राहुल उर्फ लखन चुडावकर व सुवर्णा भाडके यांनी आरोपींना सल्ला दिला. घटनेच्या आधीपासुन आरोपी उत्तम व पत्नी उर्मिला हे सर्व कुटुंबासह पुणे वास्तव्यास होते. त्या ठिकाणी मांत्रिक आरोपीची ओळख झाली होती. सर्व आरोपी पिंपळगाव येथे अमावस्या, पोर्णिमेला पूजा करण्यासाठी येत असत. घटनेच्या 15 दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे येऊन आरोपीनी कट कारस्थान करुन कृष्णा याचा नरबळी देण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी आरोपी उत्तमच्या घराशेजारी खड्डा खोदून त्याठिकाणी मयत कडुबाईची समाधी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. या प्रकरणात आरोपी व मयत यांना एकत्र पाहणारा साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, आरोपीच्या मोबाइलचे रेकॉर्डींग व टॉवर लोकेशन, कराड येथील मुर्तीकार, समाधीचे बांधकाम घेणारा गुत्तेदार, आरोपी लखनचा मित्र यांची साक्ष महत्वुपूर्ण ठरली.

या प्रकरणातील काही महत्वाचे साक्षीदार फितुर झालेले होते. गुन्हा पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासात निष्पन्न झाला नव्हता. मात्र कृष्णाच्या मृत्युपुर्वी व मृत्युनंतर घडलेल्या छोट्या छोट्या घटनाची साखळी परिस्थिती जन्य पुरावा पुर्ण करण्यात सरकारी पक्षाला यश आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या