Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक मनपात पुष्पोत्सवाचे आयोजन; आज उद्घाटन

नाशिक मनपात पुष्पोत्सवाचे आयोजन; आज उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनंतर महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवनमध्ये तीन दिवसीय पुष्पोत्सवाला शुक्रवार (दि.24)पासून प्रारंभ होत आहे. बाजीराव मस्तानी फेम अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता या पुष्पोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी रंगवेध हा नृत्याचा कार्यक्रम होणार असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व पुष्पोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेमार्फत सन 1996 पासून पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमात सन 2011 पासून खंड पडला होता. सन 2019 पासून यास पुनश्च सुरुवात करण्यात आली. परंतु करोनामुळे दोन वर्षे पुष्पोत्सवाचे आयोजन करता आले नाही. यावर्षी सर्व अडचणी दूर करून दि. 24 ते 26 मार्च या कालावधीत पुष्पोत्सवाचे आयोजन केले आहे.

विविध गटात स्पर्धकांमार्फत सुमारे 577 प्रवेशिका आल्या आहेत. नर्सरी व फूड स्टॉलदेखील पुष्पोत्सवात असून सर्व 31 नर्सरी स्टॉल व 11 फूड स्टॉलचे बुकिंग झाले आहे. प्रवेशद्वारावर अन्य कमान उभारण्यात आली आहे. प्रांगणात सेल्फी पॉईंटदेखील उभारण्यात आला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असून पुष्पप्रेमींना या प्रदर्शनास सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत भेट देता येणार आहे.

फळे, भाजीपाला आकर्षण

मिनीएचर लॅन्डस्केपिंग, कार्यालयाच्या तीनही मजल्यांवर विविध गटांची मांडणी, विविध गटांमध्ये गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत.

अभिनेता गणेशपुरे यांच्या हस्ते पुरस्कार

शनिवारी (दि. 25) पुष्पोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ‘स्वर सुगंध’ हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिनेअभिनेता चिन्मय उद्गीरकर व किरण भालेराव यांचीदेखील उपस्थिती असणार आहे. रविवारी (दि.26) पुष्पोत्सवाची सांगता होणार असून यावेळी आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या