नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :
येथील नेहरू चौकात शुक्रवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या नादात खताने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही.
आज दुपारी तालुक्यातील गुजरभवाली येथून विना नंबरच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत खत भरून इंद्रिहट्टीकडे जात असतांना नेहरू चौकात अचानकपणे दुचाकीस्वार ट्रॅक्टर समोर आल्याने अर्जंट ब्रेक लावत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दुचाकीस्वार सुसाट वेगाने निघून गेला. परंतु शेणखताने भरलेली ट्रॉली चौकात पलटी झाली. यावेळी शेतकरी ट्रॅक्टर चालक वकील आसाराम पाटील रा.इंद्रिहट्टी घाबरला होता.
या प्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी भेट देवून जेसीबीला पाचारण करण्याबाबत सुचना दिल्या.
शहर पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी वाहतूक शाखेस माहिती दिली. त्यानंतर तत्काळ वाहतूक पोलिस चंद्रशेखर सोनवणे, महिला पोलिस जयश्री सोनवणे यांनी नेहरू चौकातील वाहतूक सुरळीत केली.
घरी अवघ्या दहा महिन्याचे बाळ असतांनादेखील महिला पोलीस जयश्री सोनवणे यांनी कर्तव्यास प्राधान्य दिले. याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. सायंकाळी उशिरा जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली उचलण्यात आली.