Thursday, April 25, 2024
Homeराजकीय10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे तालुक्यासह जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन दहा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्याची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

आ. पाटील यांनी मुंबईत पालकमंत्र्यांना भेटून नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर हेही उपस्थित होते.

धुळे तालुक्यासह जिल्हयात गेले दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बीतील पिके आणि भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे या पिकांवर विविध रोगांचाही प्रादुर्भाव झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून आ. कुणाल पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आज दि. 15 डिसेंबर रोजी पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांची मुंबई तातडीने भेट घेवून निवेदन दिले.

यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांना जिल्हयातील पिक परिस्थितीबाबत माहिती देत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्यावतीने कैफीयतच मांडली. पालकमंत्र्यांशी चर्चा करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, शुक्रवार दि.11 डिसेंबरपासूनच जिल्हयात ढगाळ व धुक्याचे वातावरण आहे.

तसेच गेल्या दोन ते तीन दिवसापासून सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभी असलेली रब्बीची पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होवून विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. रब्बीमध्ये गहू, हरभरा, दादर, कांदा इत्यादी पिके घेतली जातात तर जिल्ह्यात केली, डाळींब, पपई, लिंबू, बोर आदी फळपिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

धुळे, शिंदखेडा, साक्री तालुक्यात कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते, त्याअनुषंगाने शेतकर्‍यांची कांदा लागवडीसाठी रोपे तयार होती तर काही शेतकर्‍यांनी नुकतीच कांद्याची लागवड केली होती.

अवकाळी पावसामुळे आणि रोगिष्ट धुक्यांमुळे कांद्याची पात अचानक पिवळसर पडली असून तांबडे दिसू लागले आहेत. परिणामी पिकाची वाढ खुंटूंन कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आहे.

तसेच गहू, हरभरा, दादरसह भाजीपाला व फळपिकांनाही त्यांचा मोठा फटका बसला आहे.धुळे तालुक्यात आर्वी, शिरुड, कुसूंबा, नेर, मुकटी कापडणे सोनगीर, लामकानी परिसरात अवकाळी पाऊस झाला. तर शिंदखेडा तालुक्यातील वर्षी, दभाषी भागात दादर पिक जमितदोस्त झाले आहे तसेच चिमठाणे, नरडाणा, बेटावद, विरदेल या भागातील पिकांचेही नुकसान झाले आहे.

दरम्यान साक्री तालुक्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस झाल्याने निजामपूर, दुसाणे, हाट्टी, बळसाणे या भागात घेतल्या जाणार्‍या रांगडी कांदा पिकाची प्रचंड हानी झाली आहे तसेच गहू, हरभरा पिक धोक्यात आले आहे.

रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांनी मशागत, बी-बियाणे, खते तसेच मजुरी असा हजारो रुपये खर्च केला आहे. मात्र अवकाळी पावसाने धुळे जिल्हयातील शेतकर्‍याला पुन्हा संकटात टाकले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन अहवाल मागवावा व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ.कुणाल पाटील व श्री. सनेर यांनी केली.

दहा दिवसात अहवाल

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान तसेच पावसामुळे वातावरणात बदल होवून धुक्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव पिकांवर झालेला आहे.

या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्हयात झालेल्या नुकसानीची पहाणी करुन तातडीने पंचानामा करण्यात यावा.

झालेल्या पंचनामाचा अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांना पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या