Thursday, April 25, 2024
Homeनगरआधुनिक पद्धतीने फळबाग लागवड अन् शेतात सीसीटीव्ही कॅमेरे

आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड अन् शेतात सीसीटीव्ही कॅमेरे

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील तरुण शेतकरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वाहन चालक संदीप पठारे यांनी आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत अडीच एकर शेतात फळझाडांची लागवड केली. याठिकाणी पाण्याचे व वेळेचे नियोजन सुरक्षेसाठी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच आधुनिकतेची जोड देत शेतीचा प्रयोग शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन असल्याने फळ विक्रीसाठी पठारे यांनी ऑनलाईनचा फार्म्युला राबवणार असून त्यांच्या या प्रयोगाचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे. राळेगणसिद्धी शेजारील पानोली गावाच्या शिवारात शेतकरी पठारे यांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने फळझाडांची लागवड केली. पठारे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाहनावर अनेक वर्षांपासून वाहन चालक म्हणून काम करीत आहेत. करोना काळात जून 2020 मध्ये हजारे यांच्या वाढदिवशी राळेगणसिद्धी अ‍ॅग्रो लिमिटेड या कंपनीची स्वतः स्थापना करत त्याने पानोलीतील सैन्य दलातील सैनिक चंद्रकात शिंदे यांची अडीच एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली.

या ठिकाणी मशागत करून, खतांचा वापर करून तेथे तैवान पिंक पेरूची 1 हजार 900 झाडांची 6 बाय 10 फुटांवर लागवड केली आहे. तसेच, गोल्डन सीताफळाची झाडे ही लावली आहेत. पाण्याच्या बचतीसाठी ठिबकची व्यवस्था करून आंतरपीक म्हणून डांगर, भोपळ्याची लागवड केली आहे. तसेच तंत्रज्ञानाची कास धरून संपुर्ण शिवारात सीसीटीव्ही कॅमेरे, सौर पंप बसविले आहेत. सौर ऊर्जेचा वापर करून शेतातील विहिरीतील पाणी ठिबकद्वारे फळझाडांना व भोपळ्याला दिले जाते.

विहिरीतील पाणी कमी झाले किंवा विजेचा दाब कमी झाला तरी पठारे यांच्या मोबाईलवर संदेश येतो. पाण्याची बचत व्हावी, म्हणून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत सर्व खर्च चार लाख रुपये झाल्याचे पठारे याने सांगितले. जवळपास 11 महिन्यांच्या झाडांना बहारदार फळे आली आहेत. ही फळे तोडणीला आली असून लॉकडाऊन असल्याकारणाने पाच किलो पेरूचे पॅकेजिंग केले जाणार असून त्याची किंमत 250 रुपये ठेवण्यात आलेली आहे.

ऑनलाईन मार्केटिंग माध्यमातून त्याची विक्री केली जाणार असल्याची माहिती पठारे यांनी दिली. या फळबागेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे वेळोवेळी भेट देत असतात व मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे पद्मश्री पोपटराव पवार यांनीदेखील फळबागेला भेट देऊन कौतुक केले आहे.

शेती परवडत नाही हे वाक्य बाजूला काढले व शेतीवर योग्य पद्धतीने लक्ष देऊन नियोजन व आधुनिकतेची जोड दिल्यास शेतीतून भरघोस उत्पन्न मिळू शकते. तरुणांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन भविष्यात आधुनिक शेती केल्यास शेतीमध्ये तरुणांना मोठी संधी आहे.

– संदीप पठारे, शेतकरी, पानोली

- Advertisment -

ताज्या बातम्या