Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधकेवळ एक पृथ्वी...

केवळ एक पृथ्वी…

सौरमालेमध्ये पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्यावर पर्यावरण आहे. प्रदूषणाने पृथ्वी, जल, वायू, आकाश या पंचमहाभूतांना विळखा घातला आहे. कार्बन डाय ऑक्साईड हा प्रदूषणातील महत्त्वाचा घटक असून त्याच्या वाढत्या प्रमाणामुळे जागतिक तापमानवाढीचे महासंकट मानवजातीवर आले आहे. हा कार्बन शोषून घेण्याचे काम केवळ वनस्पती, वृक्ष आणि जंगले करतात. म्हणूनच यंदा पर्यावरणदिनाची थीम ‘केवळ एक पृथ्वी’ अशी आहे.

आपले संपूर्ण पर्यावरण पंचमहाभूतांपासून बनलेले आहे, असे आपण म्हणतो. तथापि सजीवसृष्टीसाठी महत्त्वाच्या असणार्‍या हवा, पाणी, जमीन, वायू या पंचमहाभूतांना मानवाने जन्माला घातलेल्या प्रदूषणाने मगरमिठी घातली आहे. डॉ. जयंत नारळीकरांसारखे खगोलशास्रज्ञ म्हणतात की, मानवाने प्रकाशाचेही प्रदूषण केले आहे. हवेच्या प्रदूषणाला वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढती संख्या, भरमसाठ विकास प्रकल्प, वाढती अनियंत्रित लोकसंख्या, वाढत्या गरजा, नैसर्गिक आणि मानवनिर्मित वणवे, जाळपोळ या गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यातून वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साईड सोडला जातो. अलीकडच्या काळाचा विचार करता कार्बनचे प्रमाण तब्बल 33 ते 36 टक्क्यांनी वाढले आहे. म्हणून आज जागतिक तापमानवाढ ही सर्वात मोठी जागतिक समस्या बनून मानवापुढे उभी राहिली आहे. जागतिक तापमानवाढीस एकटा कार्बन डाय ऑक्साईड हा 72 टक्के जबाबदार आहे.

पर्यावरणातील दुसरा घटक आहे पाणी. पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यातील पिण्यायोग्य पाणी फक्त दोन टक्के असून त्यापैकी बहुतांश पाणी बर्फाच्या रूपामध्ये ध्रुव प्रदेशात आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हा बर्फ वितळून समुद्राला मिसळू लागला आहे. परिणामी, समुद्राची पातळी वाढून अनेक शहरे-देश बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. पिण्यायोग्य पाण्यापैकी 95 ते 98 टक्के पाणी मानवाने प्रदूषित केलेले आहे. ध्वनिप्रदूषणही अलीकडील काळात वाढले असून त्याचा फटका मानवालाच नव्हे तर पक्ष्यांनाही सोसावा लागत आहे. तिसरीकडे रासायनिक खतांचा बेसुमार वापर, कीटकनाशके-तणनाशके यांचा मारा यामुळे जमिनीचे प्रदूषणही टिपेला पोहोचले आहे.

- Advertisement -

वातावरणात असणारा कार्बन डाय ऑक्साईड निसर्गामध्ये फक्त वनस्पतीच शोषून घेऊ शकतात. वनस्पती हा जैवविविधतेचा पाया आहे. त्या आहेत म्हणून मानव व इतर सजीव या पृथ्वीतलावर अस्तित्व टिकवून आहेत. वनस्पतींमध्ये जंगलांचा आणि वृक्षांचा भाग महत्त्वाचा आहे. याखेरीज फायटो प्लँटॉन या पाण्यावर तरंगणार्‍या सूक्ष्म वनस्पतीदेखील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन वातावरणात सोडतात. थोडक्यात, कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजन यांच्यातील संतुलन ठेवण्याचे काम निसर्गच करत असतो. परंतु विकासाच्या नावाखाली निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. राष्ट्रीय वननीतीनुसार भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक आहे. परंतु आपल्या देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ 20.60 टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. यामध्ये महत्त्वाच्या असणार्‍या दाट वनांची टक्केवारी फक्त 9 टक्के इतकीच आहे. लोकसंख्यावाढीमुळे नैसर्गिक स्रोतांचा वापर प्रचंड वाढला असून आधुनिकीकरणाच्या छताखाली वनांची प्रचंड कत्तल करण्यात आली आहे.

उपग्रहावरून टिपलेल्या प्रतिमांमधून आपले वृक्षाच्छादन दरवर्षी 13 कोटी मीटर या वेगाने नष्ट होत आहे. भारतात दरवर्षी सरासरी सात अब्ज वृक्षांची तोड केली जाते. समृद्ध पर्यावरण विकासासाठी प्रतिव्यक्ती 422 वृक्षांची आवश्यकता असते. अमेरिकेसारख्या विकसित देशात ही संख्या 699 इतकी आहे. तेच ऑस्ट्रेलियामध्ये 3,266 आहे. तर चीनमध्ये 130 इतके आहे. पण आपल्या देशात ही संख्या अवघी 28 इतकीच आहे. सन 2020 मध्ये ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन खोर्‍यातील 13 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावरील सदाहरीत वर्षावने जळून नष्ट झाली आहेत, तर गतवर्षी ऑस्ट्रेलियामधील 18.6 दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पूर्णपणे नष्ट झाले आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असणार्‍या हिमालय भूप्रदेशात आणि पश्चिम घाट परिसरात तसेच तेथे असणार्‍या इको सेन्सेटिव्ह झोनमध्येही विविध प्रकल्पांमुळे बेसुमार वृक्षतोड आणि जंगलांचा विनाश सुरू आहे. 70-75 वर्षांपूर्वी पश्चिम घाट परिसरातील 68 टक्के भूक्षेत्र वनांनी व्यापले होते, पण या परिसरात आज अवघे 37 टक्के जंगल शिल्लक राहिले आहे. भारतातील 45 हून अधिक वृक्षप्रजाती जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. संपूर्ण पृथ्वीचा विचार करता दरवर्षी सुमारे 164 दशलक्ष हेक्टर म्हणजे नेपाळच्या आकाराएवढी जंगले नष्ट होताहेत. परिणामी 2050 पर्यंत जगातील सुमारे 10 लाख प्रजाती निव्वळ हवामान बदलामुळे संकटग्रस्त होतील आणि जवळपास 4 लाख प्रजाती 2100 सालापर्यंत नामशेष होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विकासासाठी मोजावी लागणारी ही किंमत मानवजातीला विनाशाकडे नेणारी आहे.

गेल्या पाच वर्षांत 57 हजार हेक्टर वनक्षेत्रांचा विकास प्रकल्पांसाठी बळी गेला आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. महाराष्ट्रात मेळघाटमधील रेल्वेमार्गासाठी सुमारे 10 हजार वृक्ष तोडले जाणार आहेत. चंद्रपूरमध्ये विमानतळासाठी 30 हजार 817 वृक्ष तोडले जाणार आहेत. मुंबई-बडोदा एक्स्प्रेस हायवे प्रकल्पात आठपदरी रस्त्यासाठी 41 हजार वृक्षांचा बळी दिला जात आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी 35 हजारांहून अधिक वृक्ष नष्ट करण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पात 31 हजारांहून अधिक वृक्षांची तोड करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात भंडारदरा-गोंदिया जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्यातील 10 हजारांहून अधिक वृक्षांची बेकायदेशीर तोड करण्यात आली आहे. पणजी-अनमोड-बेळगाव महामार्ग रुंदीकरणासाठी 40 हजारांहून अधिक वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. कर्नाटकातील कैगा ते गोवा या पॉवर ट्रान्समिशन लाईन प्रकल्पात सुमारे 177 हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे.

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात 1973 मध्ये 74.19 टक्के वनक्षेत्र अस्तित्वात होते, पण विविध विकास प्रकल्पांमुळे 2018 पर्यंत ते 26.14 टक्के वनक्षेत्र नष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातील एका हिर्‍याच्या खाणीसाठी मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 30 लाख झाडांची कत्तल करणार आहे. माणसाच्या जगण्यासाठी शुद्ध हवा महत्त्वाची आहे; परंतु जनतेला बरेचदा याची खबरबातही नसते किंवा बहुतांश समाज याबाबत उदासीन असतो. परंतु भविष्यकाळात प्रकल्पांची संख्या अशीच वाढत राहिल्यास वने-जंगले, वृक्ष शिल्लक राहतील का? त्यावेळी पर्यावरणाची स्थिती काय असेल? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे सागरी पाण्याचा सामू (पीएच) कमी होतो आहे, खारटपणा कमी होतो आहे. यामुळे तसेच वाढत्या जलप्रदूषणामुळे फ्लायटो फ्लँटॉनचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. परिणामी त्यांच्याकडून तयार होणार्‍या प्राणवायूच्या प्रमाणातही घट होत आहे. सद्यस्थितीत वायूप्रदूषणापासून वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी आपण केवळ वृक्ष व वनस्पतींवर अवलंबून आहोत.

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे ही आज सर्वात महत्त्वाची गरजेची बाब आहे. त्याखेरीज जागतिक तापमानवाढ कमी होणार नाही. यासाठी असलेली वनसंपदा जपून ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जाता जाता विं. दा. करंदीकरांच्या वृक्षांचे महत्त्व सांगणार्‍या या ओळी उद्बोधक ठरणार्‍या आहेत. ते म्हणतात, ‘झाडे ही पक्ष्यांपेक्षा शहाणी असतात, माणसापेक्षा शहाणी असतात. म्हणूनच ती जगभर फिरत बसत नाहीत. एकाच ठिकाणी स्थिर असतात. हात वर करून उभी असतात. एक दिवस आकाश कोसळणार आहे. पण ही झाडेच त्याला सावरणार आहेत.’

- Advertisment -

ताज्या बातम्या