Thursday, April 25, 2024
Homeनाशिकऑनलाईन संत साहित्य परिषद 15 जुलै पासून

ऑनलाईन संत साहित्य परिषद 15 जुलै पासून

नाशिक | Nashik

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ‘भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद’ 15 ते 18 जुलै 2021 या कालावधीत ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

या परिषदेचे उद्घाटन गुरूवार (दि. 15) दुपारी 2 वाजता होणार आहे. या सत्राचा विषय ‘भारतीय संतसाहित्याचा उच्चशिक्षणात समावेश काळाची गरज’ हा आहे.

या परिषदेमध्ये नामवंत शिक्षण तज्ञ, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. या पहिल्या भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे आणि कीर्तनकार ह.भ.प. रविदास महाराज शिरसाट हे कार्याध्यक्ष म्हणून कार्य करणार आहेत. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांची संकल्पना आणि पुढाकार आणि विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदशनाखाली ही परिषद संपन्न होणार आहे.

भारतीय संत साहित्यामध्ये अनेक वैज्ञानिक व तात्त्विक तथ्यांचा उल्लेख आढळतो. अर्थात भारतीय संतांना भारतीय ज्ञानपरंपरेतून उपजलेल्या अनेक शोधांबद्दल माहिती होती.अनेक पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या नावे असलेले शोध हे पूर्वी भारतामध्ये लागले असल्याचे आता जगासमोर आले आहे.

म्हणजेच, ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, भक्ती आणि श्रद्धा या सर्वांचा ऊहापोह करणारे संतसाहित्य ह्याचा उच्चशिक्षणात समावेश होणे ही काळाची गरज आहे. हा हेतू ठेवून, चार दिवसांची ही परिषद आयोजित करण्यात आली आहे असल्याचे कराड यांनी सांगितले.

या परिषदेत ज्या कीर्तनकार, प्रवचनकार आणि विणेकरांना सहभागी व्हायचे असेल, त्यांनी शालीकराम महाराज खंदारे, महेश महाराज नलावडे व रामचंद्र महाराज इंगोले यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदेच्या संयोजन समितीचे समन्वयक डॉ. संजय उपाध्ये यांनी केले आहे.

या चार दिवसीय सत्रांमधील असे विषय

1. संतसाहित्य – समृद्ध जीवन जगण्याचे आधुनिक शास्त्र

2. वारकरी संप्रदाय विचार : आधुनिक की कालबाह्य

3. भारतीय संतविचाराचे खच्चीकरण इंग्रजी शिक्षणपद्धतीने केले काय?

4.संत आणि आरोग्य व्यवस्थापन

5. आमच्या तत्त्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले?

6. भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?

- Advertisment -

ताज्या बातम्या