ऑनलाईन पेमेंटची मजल ‘चणे फुटाण्या’पर्यंत

jalgaon-digital

नाशिक । गोकुळ पवार 

आजकाल सर्वकाही ऑनलाईन मिळत असून अगदी रस्त्यावर, गाड्यावर मिळणारे चणे- फुटाणे देखील आता ऑनलाईन मिळू लागले आहेत. सध्या ऑनलाईन पेमेंट अँप म्हणून ओळख असलेल्या फोन पे चा वापर या चणे फुटाणे विक्रेत्याकडून केला जात आहे.

सध्याचे युग इंटरनेटचे असल्याने सर्व गोष्टी ऑनलाइन उपलब्ध असतात. ऑनलाईन शॉपिंगची पद्धत ग्राहकांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे.

रस्त्यावरील गाड्यांवर मिळणारे चणे फुटाणे पाच रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत मिळतात. त्यामुळे चणे फुटाणे घेतल्यानंतर साहजिकच ग्राहक सुट्टे पैसे किंवा जास्तीत जास्त दहा-वीस रुपये देत असतो. परंतु ऑनलाईनचा जमाना असल्याने या विक्रेत्यांनी फोन पे चा आधार घेत व्यवहार सुरु केला आहे. चणेफुटाण्यांच्या गाड्यांवर देखील फोन पे हे ऑनलाईन पेमेंट अँप विक्रेते वापरताना दिसून येत आहे.

सर्वसामान्यांचे व्यवहार बँकेद्वारे होतात. परंतु सध्या बँकांचे डिजिटलायझेशन झाल्याने ग्राहक आणि बँक यांचे व्यवहारही ऑनलाईन होत आहेत.

यामुळे दुकाने, मॉल, सराफ बाजार, ऑनलाईन शॉपिंग येथे पेमेंट अँप वापरता येते. त्यामुळे कालपरवापर्यंत घरातील मोठ्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस, दैनंदिन वापरातील विशिष्ट वस्तूंपर्यंत मर्यादित असलेल्या ऑनलाईन माध्यमांचा वापर आता चणे फुटाण्यांपर्यंत येऊन ठेपला आहे.

नुकताच ऑनलाइनच्या माध्यमातून व्यवहार सुरु केला असून यामुळे पैशाची बचत होते. तसेच खर्चाची आणि वेळेचीही बचत होऊ लागली आहे. सध्या अनेक छोटे व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी या अँपचा वापर करीत आहेत.

– संदीप विश्वकर्मा, व्यावसायिक

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *