Thursday, May 9, 2024
Homeनाशिकआयटीआयची ऑनलाईन परीक्षा ऐनवेळी रद्द

आयटीआयची ऑनलाईन परीक्षा ऐनवेळी रद्द

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

सर्व्हरची समस्या व हॉलतिकीट वाटपाच्या घोळामुळे आयटीआय अभ्यासक्रमाच्या इलेक्ट्रीशियन कोर्स आणि कॉम्प्युटर ऑपरेटींग अँड प्रोग्रॅमिंग या दोन विषयांची ऑनलाईन परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगवर (डीजीटी) ओढावली.

- Advertisement -

कोणतीही लेखी सूचना न देता परीक्षा आयोजित केल्याने परीक्षा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अखेर परीक्षाच रद्द झाल्याने 15 हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग (डीजीटी) च्या माध्यमातून आयटीआयची परीक्षा घेण्यात येते. इलेक्ट्रीशियन कोर्स आणि कॉम्प्युटर ऑपरेटींग अ‍ॅण्ड प्रोग्रॅमिंग या दोन विषयांची ऑनलाईन परीक्षा जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात येणार होती. परंतु, करोनामुळे लांबणीवर गेलेली परीक्षा 28 व 29 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत घेण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबतच्या तोंडी सूचना राज्यातील आयटीआय प्रशिक्षण संस्थांना देण्यात आल्या.

पण, परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच मिळाले नाही. विद्यार्थी आणि पालक परीक्षेचा वेळ होईपर्यंत हॉलतिकीट डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर परीक्षेची वेळ जवळ आल्याने हॉलतिकीटाशिवाय विद्यार्थ्याना परीक्षेस बसू देण्याच्या सूचना डीजीटीने दिल्या; मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांमागचे शुक्लकाष्ठ संपले नाही. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लॉगीनसाठी असंख्य अडचणी येत होत्या.

काही जणांना प्रश्नपत्रिकाच दिसत नव्हती. काहींच्या डेस्कस्टॉपवर एरर मेसेज येत होता; तर अनेकांची प्रोफाईल आणि क्यूआर कोडच गायब होता. परीक्षा संपण्याची वेळ आली तरी या तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने अखेर (दि.28) परीक्षा रद्द झाल्याचे डीजीटीला जाहीर करावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या