Friday, April 26, 2024
Homeनाशिककांदा निर्यात बंदी

कांदा निर्यात बंदी

लासलगाव । Lasalgaon (वार्ताहर)

कांद्याने तीन हजाराचा टप्पा ओलांडल्याने केंद्र सरकारने तडाखा फडकी बाजारभावावर अंकुश ठेवण्यासाठी आज कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. गेल्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 45 टक्क्यानी वाढ झाल्याने वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक अमित यादव यांनी हा निर्णय जाहीर केला.

- Advertisement -

संपूर्ण देशामध्ये करोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 15 मार्च 2020 रोजी कांद्यावरील निर्यातबंदी उठवत पुन्हा निर्यात खुली केली होती.

सहा महिन्यातच कांदा निर्यातबंदी लादल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. फक्त शहरी ग्राहकाला खुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका बळीराजाकडून केली जात आहे.

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून चीन आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती, लॉकडाउन केल्यानंतरही करोनाचा सुरू असलेला फैलाव यासह अनेक मुद्द्यांवर संसदेमध्ये विरोधी पक्षाकडून घेरण्याच्या रणनीतीत कांद्याचा मुद्दा येऊ नये याकरिता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदीची घोषणा केल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव तीन हजार रुपयांवर गेले आणि केंद्र सरकारने निर्यात होणारा कांदा हा मुंबई पोर्टवर तर बांगलादेश सीमेवर दिवसभर रोखून धरल्याने या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला.

यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू ठेवावी आणि कांद्याच्या बाजारभाव कोसळतील असे कुठलेही निर्बंध लादू नये अन्यथा संपूर्ण राज्यभरात रस्ता रोको , रेल रोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे.

अतिवृष्टीने श्रीलंकेतील नवीन कांद्याचे तर पाकिस्तानमधील साठवलेल्या कांद्याचे साधारणता 50 ते 60 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले तर दक्षिणेकडील कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे नवीन येणारा कांदा हा बाजारात दाखल झालाच नाही त्यात महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील नवीन कांद्याच्या पिकाला ही फटका बसल्याने चाळीत साठवलेल्या कांद्याला मागणी वाढली आहे.

यामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आज लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव हे तीन हजार रुपयांच्यावर गेले. बाजार भाव वाढत असल्याने झालेला उत्पादन खर्च भरून निघणार असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या.

मात्र कांद्याचे वाढते बाजार भाव पाहता मुंबई पोर्ट वर मलेशिया, कोलंबो, दुबई सह इतर विदेशात निर्यातीसाठी 400 कंटेनरमधील 12 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता दाखवल्याने पस्तीस कोटीहून अधिकचा कांदा हा खराब होण्याची भीती निर्यातदार व्यापार्‍याकडून व्यक्त केली जात आहे.

भाव वाढताच केंद्राकडून निर्णय गेल्या पाच-सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील होते. मात्र आता कोठेतरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही तत्काळ मागे घ्यावी आणि निर्यात पूर्ववत सुरू करावी अन्यथा रास्ता रोको, रेल रोकोसारखे आंदोलन करण्यात येईल.

भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या