कांद्यावर चिंतेचे ढग

अंबासन । प्रशांत भामरे | Ambasan

अचानक कोसळत असलेला बेमोसमी पाऊस (Unseasonal rain) तसेच धुके (fog) व ढगाळ हवामानामुळे (Cloudy weather) वातावरणात झालेल्या बदलांमुळे पसरत असलेल्या रोगराईमुळे (Disease) कांदा उत्पादक (Onion growers) शेतकर्‍यांच्या मनात धडकी भरली आहे.

अवकाळीच्या संकटातून सावरत रात्रीचा दिवस करत तसेच दामदुप्पट मजुरी देत उन्हाळ कांद्याची लागवड (Planting of summer onions) केली जात असतांनाच गत दोन-तीन दिवसांपासून उघडकीप घेत बरसत असलेला पाऊस शेतकर्‍यांची (farmer) झोप उडविणारा ठरला आहे. पावसासह धुके, ढगाळ हवामान, वातावरणातील आर्द्रता यामुळे कांद्यावर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने लागवड केलेला कांदा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणीत उत्पादक शेतकरी मग्न झाल्याचे चित्र मोसमखोर्‍यात दिसून येत आहे. अतीवृष्टी (heavy rain) – अवकाळीपाठोपाठ रोगट हवामानाबरोबर बेमोसमी पावसाचे संकट उभे ठाकल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

लाल कांदा (red onion) काढणीचा व उन्हाळ कांदा (Summer onion) लागवडीचा हंगाम सुरू झाला असतांना गेल्या महिन्यात अचानक अवकाळी पावसाने धुवाँधार वृष्टी करत शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम केले होते. डिसेंबर महिन्यात कांदा लागवडीसाठी चांगले वातावरण असते. कारण लागवड झाल्यावर आवश्यक पोषणासाठी लागणारे थंडीचे (cold) वातावरण नंतरच्या महिन्यांमध्ये सापडत असल्याने शेतकर्‍यांनी लाल कांदा काढण्याबरोबरच रात्रीचा दिवस करत उन्हाळ कांद्याची लागवड हाती घेतली होती.

यासाठी दामदुप्पट मजुरी देण्याची तोशीष देखील शेतकर्‍यांनी सहन केली. मजूर कमी पडत असल्याने संपुर्ण कुटूंबच रात्री थंडीत कुडकुडत शेतात हॅलोजन लावून कांदा लागवड करीत असल्याचे चित्र ठिकठकाणी दिसून येत होते. चांगला भाव मिळत असल्याने डोक्यावर असलेले कर्जाच्या ओझ्याचा भार उन्हाळ कांद्याच्या विक्रीतून हलका करता येईल या आशेतून शेतकर्‍यांतर्फे जास्तीतजास्त क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जात होती. मात्र निसर्ग संकटाची मालिका जणू बाकी असावी या अर्थाने अवकाळी पावसासह वातावरणातील बदलाने लागवड केलेल्या कांदा रोपांची अतोनात हानी केली.

दाट धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात पसरलेल्या रोगराईचा फटका देखील कांद्याच्या रोपांना बसला तर काढणीवर आलेल्या लाल कांदा पावसासह चिखलात भिजल्याने खराब झाला. या दुहेरी फटक्याने शेतकरी (farmer) अक्षरश: हताश झाले. मात्र या संकटातून त्वरेने सावरत पुन्हा महागडी रोपे विकत घेत कांदा लागवड हाती घेण्यात आली. अवकाळीमुळे शेती तयार करण्यास उशीर झाला असला तरी दामदुप्पट मजुरी देत कशीबशी कांद्याची फेर लागवड शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे. मजुरांच्या उपलब्धतेनुसार आज देखील मोसमखोर्‍यात अनेक गावांमध्ये कांद्याची लागवड सुरू आहे.

जानेवारी महिना सुरू झाल्याने थंडीला (cold) सुरवात झाल्याने अगोदर लागवड झालेल्या कांदा पिकाची निंदणी करून रासायनिक खतांचे डोस देण्यास शेतकर्‍यांनी सुरवात केली होती. मात्र निसर्ग संकट काही पिच्छा सोडण्यास तयार नसल्याने अचानक वातावरणात बदल होवून धुके पडण्यास सुरवात झाली. मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्यामुळे कांदा पिकावर पिवळा पणा येण्यास प्रारंभ झाला. त्यातच थंडीचे प्रमाण चांगलेच कमी होवून वातावरणात दुपारनंतर हिट जाणवू लागली. कधी थंडी तर कधी तीव्र तापमान या वातावरणातील बदलामुळे कांद्यावर विविध रोगांनी आक्रमण करण्यास प्रारंभ केला आहे.

बुरशीजन्य आजाराबरोबरच अळीचे प्रमाण देखील यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मोहासारखे आजार सुध्दा कांद्यावर कधी नव्हे ते आल्याने लागवड करताच किटकनाशके कांद्यावर मारण्याची वेळ यंदा प्रथमच शेतकर्‍यांवर आली आहे. आधीच रासायनिक खतांचे वाढलेले भाव त्यातच विविध रोगांपासून रोपांना वाचविण्यासाठी महागड्या विविध औषधांची फवारणी करण्याची वेळ मोसमखोर्‍यातील शेतकर्‍यांवर आली आहे. या रोगराईमुळे उत्पादन घटण्याची भिती व्यक्त केली जात असून निघणार्‍या कांद्यातून उत्पादन खर्च तरी वसुल होईल कां? ही चिंता शेतकर्‍यांना त्रस्त करून सोडणारी ठरत आहे.े दामदुप्पट मजुरी देवून सुध्दा कांदा उत्पादक मजुर टंचाईने हवालदिल झाला असतांना आता वातावरणातील बदलामुळे अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. यंदा मजुर टंचाईमुळे कांदा लागवड फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहणार आहे.

कांदा उत्पादन करणे मोठे जिकरीचे झाले असून पूर्वीप्रमाणे सहजरीत्या येणारे उत्पादन राहिले नाही. कांदा निघेपर्यंत कमीत कमी पाच ते सहा वेळेस विविध औषधांची फवारणी करावी लागते. वातावरणातील बदलामुळे फवारणी करणे गरजेचे झाले आहे. कांदा पिकविणे सुद्धा फळबागा प्रमाणे झाले आहे. एवढ्या सर्व संकटातून कांदा वाचून बाजारात आणला तर भाव मिळत नाही त्यामुळे शासनाने कांदा उत्पादकांसाठी काहीतरी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

संजय भामरे, मा. सभापती, कृउबा नामपूर

सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी बेमोसमी पाऊस पडत असल्याने जास्त नुकसान कांदा उत्पादक शेतकरी वर्गाचे होत आहे. सकाळी वातावरणात धुके आणि सकाळचे ऊन एकत्र कांदा पिकावर पडल्यास मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकर्‍यांना बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. शेतकर्‍यांचा आर्थिक खर्च मोठ्याप्रमाणावर होत असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांदा उत्पादकांवर अस्मानी संकट आल्याने त्याचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.

अभिमन पगार, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

मागच्या महिन्यात अवकाळी पावसाने शेत तयार करायला उशीर झाल्यामुळे रात्रीची कांदा लागवड सुरू आहे. अवकाळी पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रोप पिवळे पडून उंची खुंटली आहे. बुरशी नाशकांची फवारणी करून देखील नुकसान टाळता येत नाही. लागवड करून वातावरणात सुधारणा झाली तरच जोमदार कांदे येतील असा अंदाज आहे. यंदा लागवड खर्च, शेत तयार करायला डिझेल महाग झाले आहे. सर्व खर्च दुपटीने वाढला आहे.

सुभाष शिंदे, शेतकरी, सोमपूर


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *