Wednesday, April 24, 2024
Homeनगरकांदा चाळ, शेततळे अस्तरीकरणास आठ कोटींचे अनुदान

कांदा चाळ, शेततळे अस्तरीकरणास आठ कोटींचे अनुदान

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने पुरस्कृत केलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नगर लोकसभा मतदारसंघातील आठ तालुक्यांतील शेतकर्‍यांना कांदा चाळ उभारणीसाठी चार कोटी 41 लाख आणि वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी तीन कोटी 41 लाख रुपयांचे प्रलंबित अनुदान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहे.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाते. कृषी विभागाच्या माध्यमातून याबाबत प्रस्ताव सादर केले जातात. या अनुदानासाठी शेतकरी वंचित राहिले होते. नगर लोकसभा मतदारसंघातील आठ तालुक्यांमधून सादर झालेल्या प्रस्तावांचा केंद्र सरकारकडे आणि कृषी विभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे 507 शेतकर्‍यांना चार कोटी 41 लाख 37 हजार 500 रुपयांचे अनुदान मंजूर झाले.

- Advertisement -

राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून सन 2019-20 अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठीही केंद्र सरकारने अनुदान मंजूर केले असून यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी 484 शेतकर्‍यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना तीन कोटी 41 लाख 10 हजार 351 रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे खा. डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. या दोन्हीही योजनांबाबत कृषी विभागाकडे शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या प्रस्तावांनाही मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू असून उर्वरीत शेतकर्‍यांनाही लवकरच या योजनेतून प्रलंबित अनुदान मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या