Thursday, April 25, 2024
Homeनगरशाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम

शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार प्रत्येक बालकाचे शाळेत नाव नोंदवले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे,

- Advertisement -

त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा अधिकार प्राप्त झाला आहे. सध्या कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कुटुंबासमवेत स्थलांतरित होणारी मुले शालाबाह्य होऊ नये यासाठी एक गाव एक बालरक्षक मोहिमेच्या माध्यमातून बालरक्षक चळवळ गतिमान करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या सर्व व्यवस्थापनाला आदेश दिले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची संख्या लक्षात घेता या मोहिमेला गतिमान करण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शिक्षक बालरक्षक म्हणून काम करेल. तसेच ज्यांना निःस्वार्थी भावनेने शालाबाह्य मुलांसंदर्भात काम करण्याची इच्छा आहे, अशी कोणतीही व्यक्ती बालरक्षक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने नियुक्त करावी.

गावामध्ये असणार्‍या प्रत्येक शिक्षकावर शालाबाह्य, अनियमित मुले शाळेत दाखल करून टिकवण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित करावी. गावातील प्रत्येक बालरक्षकावर समन्वयाची जबाबदारी देण्यात यावी. बालरक्षकाचे नाव शाळेच्या दर्शनी भागावर व ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर लावावे.

सदर बालरक्षक पालक मेळावे, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक मेळावे यामध्ये शालाबाह्य मुलांची माहिती देतील. शिक्षक, मुख्याध्यापक त्यांना मदत करतील.सदर बालरक्षकांनी बालकांचे नियमित शाळेत येणे, शालेय विषयांच्या क्षमता प्राप्त करणे, त्यांचे योग्य पोषण होणे, पाठ्यपुस्तक मिळाल्याची खात्री, वयानुरूप दाखल विद्यार्थ्यांना शालेय विषयांच्या किमान मुलभूत क्षमता प्राप्त होईल याची खात्री बालरक्षक व शिक्षकांनी करावी.

सद्यस्थितीत कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सर्व मुलांपर्यंत ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण पोहचवून शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी सुसंवाद साधावा. बालरक्षकांनी बालकांचे स्थलांतर कसे रोखता येईल यासाठी मदत करावी. बालरक्षकांनी शासनाच्या संकेतस्थळावरही ड्रॉपबॉक्समध्ये असणार्‍या मुलांची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यात यावा.

स्थलांतराचा मोठा फटका

राज्यात सध्या करोनामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. महानगरातून अनेक पालक मूळ गावी राहण्यास आले आहेत, तर अनेक पालक परराज्यातून आले आहेत.पर राज्यातील अनेक मुले आपल्या राज्यात आली आहेत. अशा परिस्थितीत या मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एकही मूल शाळेबाहेर राहू नये यासाठी विविध स्तरावरती समित्या गठित करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्याचा दरमहा आढावा

शासनाने सध्याच्या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासंदर्भात ने गंभीरपणे विचार सुरू केला आहे. वर्तमानात एकही मूल शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहू नये. यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंबंधी जिल्हा स्तरापासूनच राज्यस्तरापर्यंत प्रत्येक स्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. सदरचा आढावा दर महा सातत्याने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोणीही बनेल बालरक्षक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने बालरक्षक चळवळ गतिमान करण्यात आली आहे. यापूर्वीच स्वयंप्रेरित भावनेने सुमारे 25 हजार शिक्षकांनी नाव नोंदणी केली आहे. यातील शिक्षकांच्या प्रयत्नामुळे हजारो विद्यार्थी स्थलांतरित होण्यापासून व शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्यास रोखण्यात आले आहेत. त्यामुळे ही चळवळ गतिमान करण्याच्यादृष्टीने सध्या ‘एक शाळा एक बालरक्षक’ ही चळवळ राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून दूर जाणे रोखेल,असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या चळवळीत शिक्षकांबरोबरच समाजातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या