Wednesday, April 24, 2024
Homeनगरधक्कादायक : करोनाग्रस्त तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक : करोनाग्रस्त तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भेंडा l वार्ताहर l Bhenda

तालुक्यातील भेंडा येथील शासकीत कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

नेवासा खुर्द येथील गणेश दिनकर करांडे (वय 40 वर्षे) या करोनाग्रस्त तरुणाने भेंडा येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, 21 एप्रिल रोजी दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा येथील 3 मजली नागेबाबा भक्तनिवास मध्ये शासकीय कोविड केअर सेंटर सुरू आहे. याठिकाणी सुमारे 190 करोना रुग्ण उपचार घेत आहेत. या कोविड सेंटर मधील तिसऱ्या मजल्यावरील कॉफरन्स हॉल मध्ये 25 रुग्ण ऍडमिट आहेत. मयत गणेश हा दि.18 एप्रिल रोजी या कोविड सेंटर मध्ये ऍडमिट झाला होता. त्याची आई सुद्धा येथेच ऍडमिट होती.

गणेशची आई व इतर सर्व रुग्ण दुपारी 12 वाजता जेवणासाठी खाली गेले मात्र गणेश एकटाच मागे थांबून राहिला. इतर सर्वजण जेवण करून आपापल्या बेडवर परतले. बराच वेळ झाला कोणी तरी तासाभरापासून बाथरूम मध्ये गेला आहे तो बाहेर येत नाही, आम्हाला पण बाथरूमला जायचे आहे अशी तक्रार इतर रुग्णांनी केल्यावर दुपारी 1:40 वाजता सफाई कामगाराने बाथरूमचा दरवाजा वाजवला.

परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने सफाई कामगाराने वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा तोडला असता गेस्ट रूम कम बाथरूम असलेल्या खोलीच्या छताला असलेल्या पंख्याला लांब कापड बांधून गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंके, पोलिस निरीक्षक विजय करे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मयत गणेश करांडे हा दररोज नेवासा येथून येऊन भेंडा परिसरात दारोदार फिरून बेकरी उत्पादने विक्रीचा व्यवसाय करत होता. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या