Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकरुग्णसंख्या वाढल्याने जुने नाशिक परिसरात पुन्हा सील

रुग्णसंख्या वाढल्याने जुने नाशिक परिसरात पुन्हा सील

जुने नाशिक | Old Nashik

कुंभारवाडा, नानावली, नाईकवाडीपुरासह जुने नाशिकच्या काही भागात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण मिळाले होते, त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते, मात्र करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे जुने नाशिक परिसरातील सर्व भागांना मिळून संपूर्ण जुने नाशिक पुढील आदेश येईपर्यंत  सील ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्यामुळे जुने नाशिक परिसरातील जवळपास सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

- Advertisement -

झपाट्याने वाढत असलेल्या करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जुने नाशिक परिसरातील कुंभारवाडा, नाईकवाडीपुरा, काजीपुरा, अजमेरी चौक, फकीर वाडी, चौक मंडई, बागवानपुरा, चव्हाटा, भिमवाडी, घास बाजार, मोठा राजवाडा, खडकाळी, कोकणीपुरासह काही भाग यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते, मात्र करोनाची रोकथाम ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे तशी होत नसल्यामुळे संपूर्ण जुने नाशिक आता सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.

यामुळे गुरुवारी दुपारपासून सारडा सर्कल येथील इमाम शाह रोड आदी भागात मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर आज पासून संपूर्ण परिसर जवळपास सील करण्यात आले आहेत. ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. अनलॉक एक सुरु असतानाही जुने नाशिक परिसर सील करण्याची वेळ आली आहे. यामुळे या महामारीची गंभीरता लक्षात येत आहे.

गुरुवारी रात्री पासून जुने नाशिकच्या चौक मंडई, फाळके रोड, मोठा राजवाडा, इमाम शाह रोड, नुरी चौक, वडाळा नाका, द्वारका, अमरधाम रोड आदी मार्ग लोखंडी जाळ्या व बांबूने बांधून सील करण्यात आले. जुने नाशिक परिसरात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण निघत असल्यामुळे प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. मागील काही दिवसात रुग्ण तसेच मृतांचा आकडा वाढला आहेत तर शहर परिसरातील करोना बाधित संख्या हजारोत पोहोचली आहे.

अशा वातावरणात शासन, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. जुने नाशिक परिसरातील घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी व्हावी तसेच रुग्णांना वेगळे करून इतरांना त्यांच्यापासून धोका होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, लोकांमध्ये विशेष जनजागृती व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

जुने नाशिक परिसरात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा जुने नाशिक परिसर सील करण्याचा निर्णय घेतला. यानुसार गुरुवारी दुपारपासून जुने नाशिक भागातील मार्ग लोखंडी जाळ्या तसेच बांबूने बंद करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढील आदेश येईपर्यंत हे सर्व परिसर ठेवण्याचे आदेश काढल्यामुळे त्याची गंभीरता लक्षात येत आहे. त्याच प्रमाणे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी तसेच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या