Saturday, April 27, 2024
Homeनगरराहात्यात जुन्या भांडणाच्या वादातून एकावर चाकूने वार; गुन्हा दाखल

राहात्यात जुन्या भांडणाच्या वादातून एकावर चाकूने वार; गुन्हा दाखल

राहाता |वार्ताहर| Rahata

जुन्या भाडंणाच्या कारणावरून डोक्यात चाकू मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने राहाता पोलिसांनी चार आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी सोमनाथ शंकर कलोरे यास राहाता पोलिसांनी संपूर्ण रात्र शोध घेऊन मोठ्या शिताफीने पहाटे अटक केली आहे.

- Advertisement -

येथील असलम उमर कुरेशी (22 रा. सुभाषनगर कोपरगाव) हल्ली रा. सुतारगल्ली, राहाता याने राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी सायंकाळी 9 वाजता कामावरून घरी आलो व हात पाय धुण्यासाठी जात असताना माझ्या ओळखीचा सोमनाथ कलोरे घरी आला व मला म्हणाला की माझे तुझ्याकडे काम आहे, दोन मिनिट माझ्यासोबत चल असे म्हणून त्याने मला संभाजी चौक येथे दर्गाजवळ नेले. त्याठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती उभे होते. त्यापैकी एक व्यक्ती म्हणाला हाच का तो? तेव्हा कलोरे म्हणाला तुला खुप गुर्मी आली आहे, असे म्हणून मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी चौघांना समजून सांगत असताना सोमनाथ कलोरे याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून माझ्या डोक्यात, डाव्या कानाच्या मागे जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून गंभीर जखमी केले. त्याच्याबरोबर असलेले तीन व्यक्ती म्हणाले त्याला जिवंत सोडू नका, असे म्हणून ते माझ्याकडे धावले असता मी त्या ठिकाणाहून पळ काढला व पोलीस स्टेशनला आलो.

मला ग्रामीण रुग्णालय राहाता येथे उपचारासाठी पाठवले असता त्यांनी मला शिर्डी साईबाबा हॉस्पिटल येथे उपचार घेण्यास सांगितले. त्यामुळे मी शिर्डी येथे उपचार घेत आहे अशी फिर्याद असलम कुरेशी याने पोलिसांत दिली.

राहाता पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ शंकर कलोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम 307, 504, 34 प्रमाणे गुन्हाा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे गुन्ह्याचा तपास करीत आहे. राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे यांनी घटना घडल्यानंतर तात्काळ संपूर्ण रात्र विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन आरोपी कलोरे याला रांजणगाव येथील राहत्या घरातून बुधवारी पहाटे ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या