Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवृद्धाश्रमांनाही ‘करोना’चा फटका

वृद्धाश्रमांनाही ‘करोना’चा फटका

नवीन नाशिक । निशिकांत पाटील

22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर नाशिक शहरातील वृद्धाश्रमांमध्ये प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात आली.

- Advertisement -

तर काही वृद्धाश्रमांनी त्यांच्याकडे असलेल्या वृद्धांना सुरक्षेच्या कारणावरून घरी पाठवून दिले. अशातच काही वृद्धाश्रमांमध्ये फक्त नोंदणी प्रक्रिया सुरू आहे, मात्र जागेअभावी त्या ठिकाणी प्रवेशासाठी वाट बघावी लागणार आहे.

नाशिक शहराचा विकास होत गेला, लोकसंख्या वाढली त्यानुसार वृद्धाश्रमांची संख्यादेखील वाढली. यात काही वृद्धाश्रम हे सामाजिक कार्य म्हणून विनामूल्य सेवा देत आहेत तर काही वृद्धाश्रम आर्थिक बाबींची पूर्तता करून व्यावसायिक स्वरुपात वृद्धाश्रम चालवित आहेत.

नाशकातील काही प्रमुख वृद्धाश्रम व्यवस्थापनांसोबत दैनिक ‘देशदूत’ने याबाबत चर्चा केली. त्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत रस्त्यावर फिरणार्‍या काही निराधार वृद्धांना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात कोविड-19 ची तपासणी करून दाखल केले. पाथर्डी फाटा येथील मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम येथे सद्यपरिस्थितीत 73 वृद्ध स्त्री व पुरुष दाखल आहेत. त्यातील केवळ 18 लोकांचे नातेवाईक पैसे देत होते.

मात्र लॉकडाऊन नंतर बर्‍याच जणांची आर्थिक स्थिती खालावल्याने त्यांचे पैसे येणे बंद झाले, मात्र या ठिकाणी दैनंदिन खर्च काही थांबला नाही. अशातच काही देणगीदारांनी किराणा व इतर मदत केल्याने वृद्धाश्रमाचा गाडा सुरू आहे. वृद्ध लोकांना करोनाचा धोका तत्काळ होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर येथे नवीन भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.

मात्र सध्या 47 महिला व 27 पुरुषांची नोंदणी येथे करण्यात आली असून जागेअभावी व करोनाचा धोका न टळल्याने या वृद्धांना वाट बघण्याखेरीज पर्याय नाही. शहरातील निसर्ग केअर सेंटर, सहारा केअर सेंटर, दिलासा केअर सेंटर, बाबा साई धाम आदी वृद्धाश्रमांमध्ये देखील सद्यपरिस्थितीत अशीच परिस्थिती असल्याचे तेथील संचालकांनी सांगितले.

वयाच्या शेवटच्या टप्प्यात वृद्धाश्रमात इतर समवयस्क लोकांसोबत जुळून वैचारिक देवाण-घेवाणीसह ते पूर्वानुभवांच्या आठवणी एकमेकांसोबत चर्चा करत येथील वृद्धांचा दिवस मावळत असतो. वयाच्या या टप्प्यात बर्‍याच वृद्धांना आवश्यकता असते ती आधाराची व तो आधार शहरातील अनेक वृद्धाश्रम देत आहेत. सध्या करोना सोबतचा लढा येथील सेवकदेखील देत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या