Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपोषक अन्नधान्ये उपेक्षितच

पोषक अन्नधान्ये उपेक्षितच

ज्वारी, बाजरीसारख्या प्रमुख तृणधान्यांना शेतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बर्‍याच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अशा धान्यांचे वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत करण्याची योजना तयार केली जात आहे. राजस्थानात बाजरी आणि दक्षिण भारतात नाचणीचे वितरण झाले आहे. या धान्यांसाठी लाभदायक हमीभाव जाहीर करणे, त्यांची सरकारी पातळीवर खरेदी, साठवणूक आणि वितरण यासाठी प्रभावी नेटवर्क तयार करणे, असे मोठे निर्णय घेण्याची गरज आहे.

नवनाथ वारे,शेतीप्रश्नांचे अभ्यासक

- Advertisement -

एके काळी भारताच्या कृषी उत्पादन प्रणालीत प्रचंड विविधता पाहायला मिळत असे. गहू, तांदूळ, जवस, राई, मका, ज्वारी, बाजरी अशी अनेक प्रकारची पिके घेतली जात असत. परंतु काळाबरोबर ज्वारी, बाजरी, नाचणी अशा प्रमुख अन्नधान्याची पिके कमी घेतली जाऊ लागली. आता परिस्थिती अशी आहे, की बदललेल्या कृषी धोरणामुळे भारताला गहू आणि भाताच्या पिकावरच अवलंबून राहावे लागते आहे. याखेरीज बाजारीकरणाच्या वाढता प्रभावामुळे अशी अन्नधान्ये, डाळी आणि तेलबियांसारख्या पिकांची शेती करण्याने शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग होऊ लागला आहे. हरितक्रांतीच्या काळात एकल पीकपद्धतीला प्रोत्साहन मिळाले तेव्हापासून भात आणि गव्हाच्या पिकाला प्राधान्याची भूमिका मिळाली. त्याचा परिणाम असा झाला की, एकूण कृषी उत्पादनातील प्रमुख अन्नधान्यांचा वाटा कमी झाला. शेतकरीही भात आणि गव्हासारखी पिकेच घेऊ इच्छितात, कारण या पिकांना हमीभाव चांगला मिळण्याची खात्री त्यांना वाटते. या पिकांचा हमीभाव दरवर्षी वाढतच असतो. त्याचप्रमाणे हमीभावासोबत राज्य सरकारेही अतिरिक्त बोनस जाहीर करतात. त्यामुळे दरवर्षी या दोनच पिकांचे क्षेत्र वाढविण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येतो. परंतु, ज्या वेगाने या दोन पिकांचे क्षेत्र वाढत आहे, त्याच वेगाने डाळवर्गीय पिके, तेलबिया आणि मुख्य तृणधान्यांचे क्षेत्र घटत चालले आहे. प्रथिनांचा मुख्य स्रोत मानली जाणारी ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखी पिके दुर्लभ बनत चालली आहेत.

उच्च कॅलरीज देणार्‍या ज्वारी-बाजरीसारख्या पारंपरिक पिकांपासून बनविलेले पदार्थ आपल्या ताटातून हळूहळू हद्दपार होत आहेत, हा चिंतेचा विषय आहे. या पिकांची शेती पर्यावरणासाठीही खूपच अनुकूल होती. परंतु, गेल्या 50 वर्षांत भारतातील या प्रमुख पिकांचे क्षेत्र जवळजवळ साठ टक्क्यांनी घटले आहे. त्याऐवजी आता गहू आणि भाताचीच शेती अधिक प्रमाणावर होऊ लागली आहे.

वस्तुतः गहू आणि भाताच्या पिकांमधून हरितगृह वायूंचे उत्सर्जन अधिक प्रमाणात होते. परंतु, या विषयाकडे फारसे कुणाचे लक्षही नाही आणि त्याची कुणी फिकीरही करत नाही. तेलबिया आणि डाळी आपण आयात करू लागलो आहोत. आपल्याकडील छोट्या-छोट्या गावांमधील बाजारांमध्येही चीनमधून आयात झालेली तूरडाळ विकली जात आहे. शाकाहारी लोकांसाठी तूरडाळ हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. परंतु, स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच या पिकांचे लागवडक्षेत्र आणि उत्पादन सातत्याने कमी झाल्याचे दिसते. डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात झालेली घट हा प्रामुख्याने लागवड क्षेत्रात घट झाल्याचा परिणाम आहे. हरितक्रांतीच्या काळापर्यंत तेलबियांच्या बाबतीत आपण स्वावलंबी होतो प्रत्येक गावांत तेलाचे घाणे चालविले जात होते. शेतकरी आपल्या शेतात उत्पादित केलेला भुईमूग, तीळ आदी पिकांपासून तेल गाळून घेत असत. परंतु आता गणपतीच्या पूजेसाठीही शेतकरी बाजारातून तीळ विकत आणतात. बाजारात हा तीळ चीन आणि ब्राझीलमधून येतो. मलेशियातून पामतेल, अमेरिका आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेल जर आलेच नाही तर तेलासाठी हाहाकार माजू शकतो.

तेलबियांच्या बाबतीत ही परिस्थिती उद्भवण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकर्यांनी ही पिके घेणेच बंद केले आहे. आता शेतात केवळ गहू, ऊस आणि भातच दिसतो. याचा थेट अर्थ असा होतो की, ही पिके आपली जैवविविधताही संपुष्टात आणत चालली आहेत. एकीकडे सोपी पीकपद्धती असलेल्या पिकांनी आपली जैवविविधता नष्ट केली तर दुसरीकडे या पिकांमुळे आपल्या पाणीसंकटात वाढ होत राहिली असून, हे संकट आता धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. वस्तुतः प्रमुख अन्नधान्ये, तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांच्या तुलनेत भात आणि गहू यांसारख्या पिकांना अनेक पट अधिक पाणी लागते.

हे पाणी जमिनीच्या पोटातून उपसले जाते. परिणामी, भूजलस्तर सातत्याने कमी होत चालला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे आणि अन्य वापरांसाठीही पाणी कमी पडत आहे. पाण्याबरोबरच या पिकांना यूरिया अधिक लागतो आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत चालली आहे. देशासाठी, शेतकर्‍यांसाठी आणि सामान्य माणसांसाठी गहू, भात आणि उसासारखी एवढीच पिके महत्त्वाची आहेत की अन्य पिकांचीही गरज आहे, यावर आता धोरणकर्त्यांनी चिंतन करायचे आहे. अन्य पिकांनाही किमान हमीभावाबरोबर प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे. केवळ गहू, ऊस आणि भाताचा हमीभाव वाढवून निवडणुकीत मते पदरात पाडून घेता येतील; पण त्यामुळे अन्य मुख्य अन्नधान्यांचा भाव बाजारपेठेच्या हवाली केला जात असून, त्यातून शेतकर्‍यांना तोटा होत आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर पिकातील वैविध्य संपुष्टात आणून आपण जलसंकट अधिक तीव्र करीत आहोत, याकडे लक्ष दिले पाहिजे.

ज्वारी, बाजरीसारख्या प्रमुख तृणधान्यांना शेतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बर्‍याच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अशा धान्यांचे वितरण सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत करण्याची योजना तयार केली जात आहे. राजस्थानात बाजरी आणि दक्षिण भारतात नाचणीचे वितरण झाले आहे. या धान्यांसाठी लाभदायक हमीभाव जाहीर करणे, त्यांची सरकारी पातळीवर खरेदी, साठवणूक आणि वितरण यासाठी प्रभावी नेटवर्क तयार करणे असे मोठे निर्णय घेण्याची गरज आहे. याखेरीज प्रमुख अन्नधान्य पिकांवरील संशोधन आणि विकासाच्या सुविधा देशभरात निर्माण करणे आवश्यक आहे.

या धान्यांच्या शेतीसाठी सवलतीच्या व्याजदरात पीककर्ज देणारा कायदा करणे आणि सरकारी अनुदानांची दिशा या प्रमुख भारतीय अन्नधान्यांकडे वळविणे शक्य झाले तरच अपेक्षित परिणाम दिसून येईल. हवामानाचे बदलते चक्र आणि एकल पीकपद्धतीमुळे होणारे नुकसान या बाबी पाहता प्रमुख अन्नधान्यांची शेती हाच भविष्यकाळातील एकमेव आशेचा किरण आहे. यामुळे केवळ शेतीचाच विकास होईल असे नाही, तर अन्नसुरक्षेबरोबरच योग्य पोषणमूल्य आणि आरोग्याची शाश्वतीही प्राप्त होईल.

प्रमुख अन्नधान्यांच्या बाबतीत सरकारचे धोरण गेल्या पाच वर्षांत जेवढे उत्साहवर्धक असायला हवे होते, तेवढे दिसून आले नाही. प्रमुख अन्नधान्यांचे बहुआयामी लाभ असूनसुद्धा सरकार त्याची खरेदी, साठवणूक आणि वितरणाची कोणतीही व्यवस्था करीत नाही. यामुळेच अशा पिकांची शेती नाइलाज म्हणूनच शेतकरी करतात. अशा स्थितीत जर सरकारने गहू आणि भाताप्रमाणे याही पिकांची खरेदी, साठवणूक आणि वितरणाचे जाळे तयार केले, तर अशा अन्नधान्याचे पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांना मोठ्या संख्येने प्रवृत्त करता येऊ शकेल. परंतु त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे आणि त्याचाच सध्या अभाव आहे. पोषक अन्नधान्यांचे उत्पादन वाढविण्याची मोहीम गेल्यावर्षी सुरू केली हे योग्यच आहे. त्याअंतर्गत देशाच्या 14 राज्यांमधील 200 पेक्षा अधिक जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, या राज्यांमधील जलवायू परिस्थिती मुख्य तृणधान्यांसाठी अनुकूल आहे. आता या अन्नधान्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी, अशा एका दुसर्‍या हरितक्रांतीची गरज आहे. त्यामुळे जलवायू परिवर्तन, ऊर्जा संकट, भूजलाचा र्हास, आरोग्य आणि अन्नधान्याचे संकट अशा सर्वच समस्या कमी होण्यास मोठी मदत होईल.

या पिकांना पाणी, खत आणि कीटकनाशकांची गरज अगती कमी प्रमाणात लागते. तसेच माती आणि भूजलस्तरावर या पिकांचा विपरित परिणाम होत नाही. याखेरीज या पिकांची शेती करण्यासाठी गुंतवणूकही कमी लागते. ही पिके दुष्काळी भागात तसेच कमी प्रतीच्या जमिनीतही चांगली येऊ शकतात. पौष्टिकता आणि आरोग्याच्या दृष्टीने ही पिके गहू आणि तांदूळ यापेक्षा कितीतरी सरस ठरतात. या धान्यांमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे आणि अन्य खनिजे तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आढळून येतात. अशी वैशिष्ट्ये असूनसुद्धा ही पिके शेतकरी, कृषितज्ज्ञ आणि धोरणकर्ते या सर्वांकडून उपेक्षित, दुर्लक्षित राहिली आहेत. या पिकांबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये जी उपेक्षेची भावना पसरली आहे, तेच यामागील प्रमुख कारण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या