Wednesday, April 24, 2024
Homeनगरपोषण आहार पुरविण्याच्या कामाला बचत गटांचा निरूत्साह

पोषण आहार पुरविण्याच्या कामाला बचत गटांचा निरूत्साह

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

गतवर्षी सरकारने गावातील महिला बचत गटांनी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी संबंधित गावातील पाच बचत गटांतील महिलांनी एकत्र येऊन टेंडर भरून ज्या बचत गटाला हे काम मिळेल, त्यांनी आहार पुरविण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

मात्र, जिल्ह्यात अनेक गावांत अशाप्रकारे महिला बचत गटांकडून टेंडर भरण्यास उत्साह दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणी केवळ एकमात्र टेंडर आलेले आहे. आलेल्या या एकमात्र टेंडरमधील महिला बचत गटांना पोषण आहार पुरविण्याचे काम देण्यात यावे, असा ठराव महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला असून तो शासनाला पाठविण्यात येणार आहे. गतवर्षी राज्य सरकारने प्रत्येक गावातील महिला बचत गटांना अंगणवाड्यांना गरम आहार पुरविण्याचे काम देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत याप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 40 गावांत याप्रमाणे कार्यवाही झालेली आहे. यात गावातील पाच महिला बचत गटांनी एकत्र येऊन काम करावयाचे आहे. जर गाव लहान असले आणि त्या ठिकाणी पाचपेक्षा कमी बचत गट असतील, तर शेजारच्या गावातील महिला बचत गटांना यात समाविष्ट करून काम घ्यावयाचे आहे.

मात्र, जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी प्रत्येक गावातून या कामासाठी एकापेक्षा जास्त टेंडर आलेले नाहीत. अशा परिस्थितती आलेल्या एकमात्र टेंंडरमधील महिला बचत गटांना हे काम करण्यास परवानगी मिळावी, असा ठराव महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तसेच समितीच्या मासिक बैठकीत एकात्मिक बालविकास सेवा योजना व महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा अंगणवाडी बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अंगणवाड्यांना पाणी व वीज कनेक्शनची मागणी करण्यात आली. सभेला अ‍ॅड. रोहिणीताई निघुते, सुनीताताई भांगरे, राणीताई लंके, अनुराधाताई नागवडे, पुष्पाताई रोहोम, बेबीताई सोडनर या सदस्यांसह सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम उपस्थित होते.

सरकारच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आठवड्यातून एकदाच अंगणवाडी उघडावी. मातांना वेगवेगळ्या वेळेत बोलावून सामाजिक अंतराचे पालन करत स्वच्छतेची काळजी घेत पाच मुलांची वजने घ्यावीत. वजन करण्यासाठी झोळी मुलाच्या मातेने घरुनच घेऊन यावी, मुलाला मुलाच्या आईनेच हाताळावे.

ज्या अंगणवाड्यांना जागा नसेल त्यांचे जागा बदल प्रस्ताव बांधकाम विभागाने 15 दिवसांत सादर करावेत, अंगणवाडी केंद्रामध्ये स्वच्छता ठेवण्याच्या सूचना सभापती शेटे यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या