Friday, April 26, 2024
Homeनगरपोषण आहार तपासणी पथकावर गुन्हा दाखल करा

पोषण आहार तपासणी पथकावर गुन्हा दाखल करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील शाळांमधील शालेय पोषण आहाराचे सोशल ऑडिट करण्यासाठी नेमलेले तपासणी पथक तपासणीच्या नावाखाली शाळेशाळेत जावून शिक्षकांकडून 10 ते 50 हजार रुपयापर्यंतच्या रकमा वसूल करत आहेत. या पथकावर शिक्षणाधिकारी यांनी तातडीने आर्थिक गुन्हा दाखल करून जिल्ह्यात चाललेली मोगलाई थांबवावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद शाळा व खासगी विद्यालयातील शालेय पोषण आहाराचे सोशल ऑडिट करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाने खासगी तपासणी पथके नेमली आहेत. त्यांना संचालक कार्यालयातून या कामाचे मानधनही दिले जाते. असे असताना या तपासणी पथकातील सद्यस्यांनी शाळांना 10 ते 50 हजार रूपयापर्यंतची मागणी केल्याच्या तक्रारी शिक्षक समितीकडे आल्या आहेत. शालेय पोषण तपासणीला येत आहोत, असा निरोप संबंधित शाळांना पाठवला जातो.

सर्व शिक्षक पोषण आहाराचे अभिलेखे अद्यावत करून ठेवत पथकाची वाट पाहतात. हे पथक थेट रात्री 9.30 ते 11 यावेळी तपासणीसाठी धडक मारते. शाळेत गेल्यावर रेकॉर्ड न पाहता मागील शाळेतून काही निरोप आला का अशी विचारणा करून तेवढी पूर्तता करा अशी धमकी दिली जाते. आर्थिक पूर्तता न केल्यास नको ते आक्षेप नोंदविले जातात. पुरक आहारात केळी आणल्याचे बिल दाखवले तरी जीएसटी असल्याचे बिल मागवले जाते. जे दाखवणे शिक्षकांना शक्य होत नाही. आर्थिक पूर्तता केली नाही म्हणून हे पथक उद्या भेटा म्हणून शेरा न देता अनेक शाळांवरून निघून गेले आहे.

या पथकातील सदस्यांची भाषाही अतिशय उर्मट आहे. ही बाब गंभीर असून शिक्षणधीकारी यांनी या खासगी तपासणी पथकाची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने आर्थिक गुन्हा दाखल करावा किंवा शिक्षक समितीस तसी परवानगी द्यावी. अशी मागणी राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, संजय धामणे, नितिन काकडे, सुदर्शन शिंदे, सुनील बनोटे, सीताराम सावंत, राजेंद्र ठाणगे, भास्कर नरसाळे, संजय नळे, भिवसेन चत्तर, विजय महामुनी, वृषाली कडलग, इमाम सय्यद, सुनील नरसाळे, रघुनाथ लबडे, प्रताप पवार, बापू आर्ले, अशोक कानडे, सुखदेव मोहिते, प्रल्हाद साळुंके इत्यादींनी केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शालेय पोषण आहारातून नेमके कुणकुणाचे पोषण होते हे तपासण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचारातून लहान मुलांच्या योजनाही सुटत नसतील तर ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी लाजिरवाणी आहे. शिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे. पुरावे म्हणून आम्ही काही बाबी प्रशासनाकडे दिल्या आहेत. शिक्षक समिती याचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

– डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते.

- Advertisment -

ताज्या बातम्या