Saturday, May 11, 2024
Homeनगरपरिचारिकांची बेमुदत संपाची हाक

परिचारिकांची बेमुदत संपाची हाक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या जिल्हा परिषद परिचारिकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त असून त्या पदांची भरती करावी, त्यासाठी

- Advertisement -

कंत्राटी आरोग्य सेवक महिलांचा प्राधान्याने विचार करावा यासह अनेक मागण्यांसाठी राज्य परिचारिका संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास 1 सप्टेंबरपासून तीन टप्प्यात आंदोलन करणार असल्याची घोषणा संघटनेने केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या परिचारिका ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही रजा न घेता परिचारिका जीवाची पर्वा न करता सेवेत आहेत.

तरीही शासनाने परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. नगर जिल्ह्यासह राज्यात आरोग्यसेविकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ती त्वरित भरावीत, ही रिक्त पदे भरताना कंत्राटी आरोग्य सेवक महिलांना प्राधान्य द्यावे, त्यांची सेवा रुजू दिनांकापासून धरून त्यांना सेवेत कायम करावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी ठरवून द्यावी, पदोन्नती देताना सेवेत हजर दिनांकापासून विचार व्हावा,

तसे आदेश शासनस्तरावर व्हावेत, ग्रामीण भागात काम करताना परिचारकांच्या संरक्षणासाठी कायदा लागू करावा, आदी मागण्यांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित अंमलबजावणी करावी; अन्यथा राज्यातील सर्व परिचारिका 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान रुग्ण सेवा विस्कळीत न करता काळ्या फिती लावून काम करतील,

तरीही मागण्या मान्य न झाल्यास 8 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारले जाईल. त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास नाईलाजास्तव बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष शोभा खैरनार व सरचिटणीस लता पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यातून सुमारे दीड हजार तर राज्यभरातून सुमारे 35 हजार परिचारिका या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. ऐन करोना काळात होणार्‍या आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील आणि राज्यातील आरोग्य सेवेला बसण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या