Thursday, April 25, 2024
Homeनगर‘तो’ हल्ला नुपूर शर्मांच्या संदर्भातील पोस्टमुळेच - आ. राणे

‘तो’ हल्ला नुपूर शर्मांच्या संदर्भातील पोस्टमुळेच – आ. राणे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कर्जत येथील प्रतिक पवार या तरुणावर झालेला हल्ला हा त्याने भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या संदर्भात टाकलेल्या पोस्टमुळे झालेला आहे. तू हिंदू-हिंदू करतोस, नुपूर शर्माचा डि.पी. ठेवतोस, म्हणून हा हल्ला झाला आहे. त्याला लक्ष्य करण्यात आले आहे, असा आरोप भाजपा आ. नितेश राणे यांनी केला.

- Advertisement -

भाजपचे आ. राणे व आ. गोपीचंद पडळकर यांनी कर्जत येथे जमावाच्या जीवघेणा हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिक पवार यांची नगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन सोमवारी दुपारी भेट घेतली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून आ. राणे यांनी भूमिका स्पष्ट केली.

आ. राणे म्हणाले की, राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार नाही. जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा आता हिंदुत्त्ववादी सरकार आहे. भाजप सरकारकडे सर्व आजारांवर औषध आहे. मी प्रतीकला भेटलो. तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला डॉक्टरांनी 24 तास निगरानी खाली ठेवायला सांगितले आहे. हल्लेखोरांचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का ? याचा पोलिसांनी तपास करावा. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यामुळे दबावात काम करू नका. पोलिसांना याचा योग्य तपास करावा लागेल.

कर्जतचे पोलीस निरीक्षक यादव यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू असताना हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले आहे. प्रतिक पवारच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगितले आहे. प्रतिकवरील हल्ला हा नुपूर शर्मांच्या संदर्भात टाकलेल्या पोस्टमुळे झालेल्याचा दावा त्यांनी केला. या तरूणाबरोबर हल्लेखोरांनी सोशल मीडियावर चर्चा झाली होती, त्याचे पुरावेही आहेत. पोलिसांकडून खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत. राज्यात आता हिंदुत्त्वाला मानणारे सरकार आहे. हिंदूंना अशा पध्दतीने लक्ष केले जात असेल तर आम्ही शांत बसणारे नाहीत. त्यामुळे कोणी घाबरू नये. असे प्रकार घडल्यास पोलिसांकडे व हिंदुत्त्वादी संघटनांकडे तक्रार करावी. कोणी मस्ती करायचा प्रयत्न करू नये. जास्त मस्ती कराल तर लक्षात ठेवा, आता हिंदुत्त्वादी सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. या प्रकरणावर त्यांचे लक्ष आहे, असे आ. राणे यांनी सांगितले. कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत. कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला.

प्रतिक पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील 12 जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन आहेत. या घटनेशी संबंध असलेल्या प्रत्येकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या चार दिवसामध्ये पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. घटनेशी संबंधीत सोशल मीडियावर भडकावू संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वी फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये भांडणे झाले होते, तसा गुन्हा दाखल आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.

– मनोज पाटील, पोलीस अधीक्षक

आ. राणे व आ. पडळकर यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. त्यावेळेस एका समाजातील धार्मिक उत्सवाच्या मिरवणुकीचा व्हिडिओ दाखविला. या मिरवणुकीत मोठ-मोठे झेंडे घेऊन तरूण सहभागी झाल्याकडे लक्ष वेधले. अशा प्रकारातून वातावरण बिघडत असल्याचा आरोप केला. पोलीस अधीक्षक पाटील यांनी हे म्हणणे फेटाळून लावले. पोलीस प्रशासन कोणत्या धर्माच्या धार्मिक उत्सवात हस्तक्षेप करत नाही. पोलिसांच्या वतीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीची जबाबदारी पार पाडली जाते, अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे या विषयावर पडदा पडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या