Friday, April 26, 2024
Homeनाशिकनेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला २४ तासांत मिळाली फसवणुकीची रक्कम

नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला २४ तासांत मिळाली फसवणुकीची रक्कम

नाशिक । Nashik

नेपाळच्या कांदा व्यापार्‍याची चांदवड तालुक्यातील व्यापार्‍याने फसवणुक केली होती. याबाबत सबंधीत व्यापार्‍याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांच्या आदेशाने चौकशी करताच अवघ्या 24 तासांत व्यापार्‍यास फसवणूकीची रक्कम चांदवडच्या व्यापार्‍याने परत केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

चांदवड तालुक्यातील ग्रीबेल एक्सपोर्टचे संचालक राहुल कचरु चौधरी यांनी नेपाळ येथील राजाराम मुक्तीनाथ रेग्मी या कांदा व्यापार्‍यास स्वस्तात कांदा देतो असे सांगितले होते. त्यानुसार रेग्मी यांनी ऑनलाइन पद्धतीने चौधरी यांना सहा लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र त्यानंतर चौधरी यांनी रेग्मी यांना कांदा देण्यस टाळाटाळ सुरू केली.

त्यांनी पैशांची मागणी करताच पैसेही दिले नाही. वारंवार मागणी करुनही पैसे मिळत नव्हते. तसेच चौधरी यांनी दिलेले धनादेशही बँकेत वटले नाही. आपली फसवणूक झाल्याचे रेग्मी यांच्या लक्षात आले. दरम्यान, रेग्मी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मोहिमेबद्दल माहिती मिळताच त्यांनी 16 फेब्रुवारीला डॉ. दिघावकर यांना तक्रार अर्ज दिला.

या अर्जाची दखल घेत लासगाव पोलिसांना तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस अधीक्षक सचीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे, लासलगावचे प्रभारी राहुल वाघ, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, आदिनाथ कोठाळे, शिपाई प्रदीप आजगे, गणेश बागुन, सागर आरोटे यांनी तक्रार अर्जाची शहानिशा करीत चौधरी यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली.

रक्कम न दिल्यास कडक कारवाईचा इशारा पोलीसांनी देताच चौधरी यांनी तातडीने रेग्मी यांना सहा लाख 50 हजार रुपयांची रक्कम परत केली. विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांच्या शेतकर्‍यांची फसवणुक टाळण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा लाभ शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. आता अडचणीतील व्यापार्‍यालाही लाभ मिळाल्याने त्याने पोलिस महानिरिक्षकांचे आभार मानले.

नाशिक परिक्षेत्रातील सहाही जिल्ह्यांच्या अधीक्षकांना आपण सुचना केल्या आहेत. शेतकरी व सुशिक्षीत बेरोजगार युवकांची फसवणूक करणार्‍यां व्यापारी अगर कंपन्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज करावे तेथे काही न झाल्यास आपणाशी संपर्क साधावा

– डॉ. प्रताप दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या