नांदगाव तालुक्यात यंदा पाणी टंचाई नाही !

jalgaon-digital
3 Min Read

नांदगाव । Nandgoan
दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या नांदगाव तालुक्यात यंदा मात्र धरणांत साठा उपलब्ध असल्याने येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली आला आहे.

नांदगाव तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यात तीन मोठी धरणे असताना दरवर्षी पाण्यासाठी वणवण करावी लागते. मागील दोन वर्षांपासून वरुण राजाने अतिवृष्टी केल्याने तालुक्यातील धरणे ओसंडून वाहत होती. आणि ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील महिलांचा त्रास कमी झाला आहे. यावेळी गिरणा, माणिकपुंज धरणात पाण्याचा मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. तब्बल दहा वर्षांनी नांदगाव शहराचे हक्काचे धरण म्हणजे दहेगांव धरण यावेळी पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.

नांदगाव तालुक्यात गिरणा धरण, माणिकपुंज, नाग्यासाग्या धरण ही मोठी तीन धरणे आहेत. गिरणाधरण, माणिकपुंज या दोन्ही धरणातून पाणी पुरवठा होतो. माणिकपुंज धरणाची ३३५ दशलक्ष घनफूट एवढी या धरणाची साठवण क्षमता आहे. सध्या धरणात १०० दशलक्ष घनफूट साठा (मृत साठा) शिल्लक आहे.

माणिकपुंज धरणावरून नांदगांव शहर व ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. तसेच मन्याड नदी किनारी असणा-या नांदगांव तालुक्यातील सावरगांव व इतर गावांना सिंचनासाठी व पिण्यासाठी नदीला पाणी सोडले जाते. तालुक्यातील पूर्व भागातील जळगांवबुद्रुक, न्यायडोंंगरी, पिंंपरखेड, मुळडोंगरी, सावरगाव, कासारी, बाणगांव, कसाबखेडा, जळगांव खुर्द, हिगणेदेहरेसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिंचनासाठी उपयुक्त ठरले आहे.

दरम्यान, नांदगाव तालुक्यात दोन (२०१९) वर्षांपूर्वी ११गावे, १०३ वाड्यावस्ती १३ खाजगी तर ०२ शासकीय टँकरने पाणी पुरवठा होत होता. आता मात्र तीन मोरझर, माळेगाव कर्यात,खिर्डी गावाचे प्रस्ताव शासन दरबारी मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज, कसाबखेडा, पोही, चिंचविहीर -२, फुलेनगर, क्रांती नगर साठी येथील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सद्यस्थितीला तालुक्यात फक्त एक टँकर सुरु आहे. त्यामुळे मागील परिस्थितीपेक्षा यंदा नांदगाव तालुका वासियांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षापासून पाणी पाऊस चांगला पडत आहे.पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत नाही. पिण्याचा व जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
-गंगाधर कुशाबा कांदे, शेतकरी जळगाव बुद्रुक

नांदगाव तालुक्यात पावसाने गेल्या दोन वर्षांपासून धरणे, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी ,शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र करोना महामारीमुळे शेतमालाला भाव कमी आहे. यंदाही पाऊस चांगला झाल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही.
-नंदु रामकर शेतकरी ,माणिकपुंज

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *