Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरपाऊस नसल्याने साडे बारा हजार हेक्टरवर नांगर

पाऊस नसल्याने साडे बारा हजार हेक्टरवर नांगर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. पिकांना पाणी नसल्याने डोळ्या देखत करपणारे पीक पाहण्यापेक्षा ते मोडलेले बरे असा विचार करत जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांवर नांगर फिरवला आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकर्‍यांकडून मोडलेल्या पिकांची आकडेवारी संकलित करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात यंदा पावसाने चांगलाच दणका दिला आहे. जून आणि जुलै महिन्यांत जेमतेम पाऊस झाला. झालेला हा पाऊस शॉवर सारखा होता. त्यानंतर ऑगस्ट महिना कोरडा गेला. यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची स्थिती बिकट झाली आहे. साधारणपणे ऑगस्टअखेर जिल्ह्यात 59 महसूल मंडळात 21 दिवसांपेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर 50 ते 95 टक्के परिणाम होणार आहे. यात मूग, उडिद, सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, तूर, खरीप हंगामातील भुईमूग आणि कांदा पिकांचा समावेश आहे.

आज उद्या पाऊस पडेल या आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला असून यामुळे त्यांनी डोळ्यासमोर जळून जाणार्‍या उभ्या पिकात नांगर फिरवला आहे. 12 हजार 300 हेक्टरवरील पिके शेतकर्‍यांनी मोडली असून यात सर्वाधिक पारनेर तालुक्यातील 6 हजार 482 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील 1 हजार 650 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 1 हजार 105 हेक्टर आहे. उर्वरित तालुक्यात पाऊस नसल्याने पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील 97 महूसल मंडलापैकी 60 च्याजवळपास महसूल मंडलातील पिकांची स्थिती बिकट आहे.

तालुकानिकाय मोडलेले क्षेत्र

नगर 900 हेक्टर, पारनेर 6 हजार 482 हेक्टर, श्रीगोंदा 1 हजार 105 हेक्टर, श्रीरामपूर 321, नेवासा 370 हेक्टर, अकोले 303 हेक्टर, कोपरगाव 1 हजार 650 हेक्टर आणि राहाता 65 हेक्टर यांचा समावेश आहे.

पावसाचा खंड असणारी महसूल मंडले

नगर- वाळकी, चास, रुईछत्तीसी. पारनेर- पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, टाकळी, पळशी. श्रीगोंदा- श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेडगाव, चिंभळा, देवदैठण. कर्जत कर्जत, राशिन, कोंभळी, माहीजळगाव. जामखेड- अरणगाव, खर्डा. शेवगाव- शेवगाव, बोधेगावख, एरंडगाव. पाथर्डी- पाथर्डी. नेवासा- नेवासा खु, सलाबतपूर, कुकाणा, वडाळा. राहुरी- राहुरी, सात्रळ, ताराहाबाद, टाकळीमियाँ, वांबोरी. संगमनेर- संगमनेर, आश्वी, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळसणे, साकूर, पिंपरणे. अकोले- वीरगाव, समशेरपूर. कोपरगाव- कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव. श्रीरामपूर- श्रीरामपूर, टाकळीभान. राहाता- राहाता, शिर्डी, बाभळेश्वर, पुणतांबा यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या