मनपाची 49 खेळाडूंना शिष्यवृत्ती

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने मंजूर झालेल्या क्रीडा धोरणांतर्गत नाशिक शहरातील आंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय, व राज्यस्तरावर प्राविण्य मिळविलेल्या 49 खेळाडूंना 6 लाख71 हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

सदरची रक्कम थेट खेळाडूंच्या बँक खात्यात वर्ग करून मनपाने खेळाडूंना आश्चर्याचा धक्का दिला आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणात शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,व राज्य स्तरावर उच्च कामगिरी करून शहराचे नाव उंचावतात त्यासाठी त्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने तरतूद करण्यात आली आहे. या गुणवत्ता धारक खेळाडूंची निवड करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या 15 नोव्हेंबर 2019 रोजीच्या आदेशाने निवड समितीची रचना करण्यात आली आहे.

त्यात मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे या निवड समितीचे अध्यक्ष असून, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त हे सदस्य सचिव तर मुख्य वित्त व लेखाधिकारी मुख्य लेखापरीक्षक मनपा क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी हे सदस्य आहेत.

या निवड समितीने सन 2019-20 व 2020-21 या आर्थिक वर्षात 49 खेळाडूंची निवड करून त्यांच्या बँक खात्यात 6 लाख 71 हजार रूपये वर्ग केले आहेत. मनपाने गुणवत्ताधारक खेळाडूंना आर्थिक मदत करून क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात केल्याबद्दल सर्व क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *