Wednesday, April 24, 2024
Homeनगरनिपाणी वाडगाव खून प्रकरण : सोपान राऊत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

निपाणी वाडगाव खून प्रकरण : सोपान राऊत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील रमेश पवार याच्या खून प्रकरणातील आरोपी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय यादव यांनी राऊत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

- Advertisement -

निपाणी वडगाव येथील रमेश पवारची पत्नी सविता, अजय गायकवाड व प्रसाद भवार यांनी पवार याला दारू पाजून त्याचे अपहरण करुन निपाणी वडगाव येथील तळ्याजवळ घेऊन गेले. त्याठिकाणी या तिघांनी गळा आवळून त्याचा खून केला. रमेश पवार याचा मृत्यू झोपेत झाला असल्याचा बहाणा करून त्याचा अंत्यविधी करण्यात येत असताना पोलिसांनी अंत्यविधी थांबवत त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यात पवार याचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलीस तपासात मयत पवार याची पत्नी सविता हिच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी तिला अटक केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अजय गायकवाड या दुसर्‍या आरोपीला अटक केली. तपासात या खुनामागे एक प्रतिष्ठीत व्यक्ती असल्याचे समोर आले तसेच प्रसाद भवार याने याप्रकरणी साक्ष नोंदवली होती. पोलिसांनी कसून तपास केला असता अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत हे मास्टर माईंड असल्याचे समोर आले. त्यांच्या सांगण्यावरून रमेश पवार याचा खून केल्याची कबुली सविता पवार व अजय गायकवाड यांनी दिली. त्यावरून या गुन्ह्यात राऊत यांना आरोपी करण्यात आले.

राऊत यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (दि. 14 जुलै) न्यायाधीश संजय यादव यांच्यासमोर झाली. यावेळी आरोपीच्यावतीने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी तसेच सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. प्रसन्न गटणे यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान पुणे येथील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी राऊत यांच्यावतीने युक्तिवाद केला होता. राऊत यांच्याविरुद्ध पोलिसांकडे कुठलाही पुरावा नसताना त्यांना आरोपी करून नंतर पुरावे शोधण्याची पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला.

पोलिसांच्यावतीने सरकारी वकील प्रसन्न गटणे यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे आहेत मात्र ते उघड करू शकत नाही, असे सांगत पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचे जवळपास 500 पानांचे दप्तर न्यायालयाला अवलोकनासाठी सादर केले असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश श्री. यादव यांनी काल सोमवारी दि. 17 जुलै रोजी राऊत यांचा जमीन फेटाळला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रसन्न गटणे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या