Tuesday, April 23, 2024
Homeधुळेनिमगुळ ‘हॉटस्पॉट’,दोन दिवसात 56 पॉझिटिव्ह

निमगुळ ‘हॉटस्पॉट’,दोन दिवसात 56 पॉझिटिव्ह

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रॅपिड टेस्ट सुरू असुन पहिल्या दिवशी 19 रुग्ण तर दुसर्‍या दिवशी 47 असे एकुण 56 रूग्ण आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्यासह पथकाने गावाला भेट देत आवश्यक सुचना दिल्या. तसचे गावात कंटेनमेंट क्षेत्र, बफरझोन घोषित करून कंटेनमेंट क्षेत्रात 14 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

करोनाबधित रुग्णांना औषधोपचार करून क्वारंटाईन करण्यात आले. 4 रुग्णांना श्वासाचा त्रास होत असल्याने त्यांना धुळे येथे एक रुग्णालयात हलविण्यात आले. तर तीन रूग्णांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दरम्यान गावात रूग्ण वाढत असल्याने निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. हितेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. त्यात गावातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख यांनी कोरोनावर मात करण्यासाठी सामूहिक कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार करावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये बाहेरगावी लग्न समारंभांना जाऊ नये, अशा सूचना दिल्या.

त्यावर ग्रामस्थांनी स्वतःहून सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली असुन तसेच सध्या महिला वर्गात पापड बनविण्याचा सिझन सुरू असल्याने तोही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दुकानदार, लहान व्यवसायिक यांनी स्वतःहून रॅपिड टेस्ट करण्याचे ठरविले असून योग्य त्या उपाय योजना करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत कडून ठिकठिकाणी बॅरिकेट बांधण्यात आले आहे.

दरम्यान अप्पर तहसीलदार सुदाम महाजन हे दि. 9 रोजी दुपारी 2 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत गावात ठाण मांडून होते. निमगूळ गावात कंटेनमेंट झोन घोषित करून त्या क्षेत्रात 14 दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली असून कडक निर्देश देण्यात आले.

अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, गटविकास अधिकारी सोनवणे, मंडळ अधिकारी पंडित दावळे, तलाठी संजीव गोसावी, मनोहर पाटील दीपक भगत, अहिरे, सुभाष कोकणी नारायण मांजळकर ,अनिल निकम, गणपतसिंग गिरासे आदींनी गावाभर फिरत नागरिकांना कोरोनाबाबच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

गावात कोणाला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून कोरोना रॅपिड टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन डॉ. हितेंद्र देशमुख यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या