Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘निमा’चा वाद पुन्हा पोलीस ठाण्यात

‘निमा’चा वाद पुन्हा पोलीस ठाण्यात

सातपूर ।प्रतिनिधी Satpur

निमाच्या निवडणुकीबाबत आरोप-प्रत्यारोपांमुळे संस्थेची प्रतिमा डागाळली जात आहे. यावर तडजोडीचा मार्ग प्रस्तावित केला असताना विरोधक मात्र कंपू करून संस्था बळकावण्याचा घाट घालत आहेत. अशा प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला असून लवकरच त्यावर आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास माजी अध्यक्ष शशिकांत जाधव व प्रदीप पेशकार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

- Advertisement -

निमामध्ये स्वतः संघर्षासाठी विद्यमान पदाधिकारी व काही उद्योजकांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. बाऊंसर नेमणे, करोनामुळे कार्यालय लॉकडाऊन करणे या प्रकारांमुळे निमाचे राजकारण चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर शशिकांत जाधव व प्रदीप पेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

त्यांच्यानुसार माजी अध्यक्ष विश्वस्त मंडळाच्या वतीने या वादात एकतर्फी भूमिका घेतली जात आहे. संस्थेची प्रतिमा डागाळली जात असल्याने तडजोडीसाठी काही ज्येष्ठ उद्योजकांचे प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सकारात्मक भूमिका घेतली व निवडणुका न घेता दोन वर्षांसाठी चिठ्ठी पद्धतीने पदाधिकार्‍यांची निवड सर्वानुमते करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. येत्या चार-पाच दिवसांत यावर सुनावणी होणार आहे.

या माध्यमातून न्यायासाठी ही दाद मागितली जात असताना निमाच्या कार्यालयातील लेटरपॅड वापरणे, त्यावर पत्रव्यवहार करणे गैर असल्याचा आरोप शशिकांत जाधव यांनी केला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तडजोडीच्या प्रस्तावावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी त्यांच्याशी चर्चा केली असताना, चिठ्ठी फॉर्म्युला त्यांनाही मान्य असल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले.

मात्र त्यानंतर आशिष नहार यांनी गटबाजीला प्रवृत्त करणारे पत्र दिल्याने चर्चा फिसकटली. प्रस्तावावर चर्चा केली जात असताना मान्यवरांद्वारे मध्यस्थी करून ती घडवून आणताना पत्र प्रपंच करणे वेगळा हेतू स्पष्ट करत आहे. कंपू करून संस्था बळकावण्याच्या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात राहणार आहोत, असेही प्रदीप पेशकार यांनी शेवटी सांगितले.

पुन्हा पोलिसात तक्रार अर्ज

निमाचा वाद यापूर्वीच पोलीस ठाण्यात पोहोचला असताना पुन्हा एकदा निमाचे लेटरहेड चोरी केल्याबाबतचा तक्रार अर्ज सातपूर पोलिसांना देण्यात आला आहे. निमा कार्यालय गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आलेले असताना विश्वस्त समितीने बेकायदेशीरपणे नेमलेल्या विशेष कार्यकारी समितीकडे निमाचे लेटरहेड आलेच कसे? असा सवाल या पत्रात उपस्थित केला आहे. त्यामुळे हा अक्षम्य गुन्हा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शशिकांत जाधव, तुषार चव्हाण यांनी पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या