Friday, April 26, 2024
Homeनगरनिळवंडे-शिर्डी, कोपरगाव पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करावी

निळवंडे-शिर्डी, कोपरगाव पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करावी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिर्डी कोपरगाव अशी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली असून ती तातडीने कार्यान्वित करावी या मागणीचे निवेदन साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांना देण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, भाजपचे नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, अतुल काले, व्यापारी नेते नारायण अग्रवाल, रिपाईचे जितेंद्र रणशूर, मनसेचे निलेश काकडे आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे, शिर्डी व कोपरगांव शहराला वारंवार भेडसावणार्‍या पिण्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याच्यादृष्टीने साईबाबा शताब्दी वर्षानिमीत्त निळवंडे धरणातून बंद पाईपलाईनव्दारे साईबाबा संस्थान, शिर्डी -शिर्डी नगरपंचायत व कोपरगांव शहर संयुक्त पाणीपुरवठा योजना तत्कालीन महाराष्ट्र सरकार व तत्कालीन साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली होती. कोपरगाव शहराला सध्याची असलेली पाणी पुरवठा योजना खुपच कमी पडत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यास कोपरगाव नगरपालिकेची यंत्रणा अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करून शिर्डी व कोपरगाव शहराला दररोज शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सन 2015 मध्ये तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचेकडे निळवंडे धरणातून शिर्डीपर्यंत येणारी बंद पाईपलाईनची योजना पुढे कोपरगाव शहरापर्यंत आणण्यात यावी, अशी मागणी केली होती.

त्यास विधानसभा पावसाळी अधिवेशनात निळवंडे धरणातून शिर्डीपर्यंत येणारी बंद पाईपलाईन पुढे कोपरगाव शहरापर्यंत नेण्यात यावी म्हणून विधानसभेच्या सभागृहाने मान्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, व्यवस्थापन समितीने निळवंडे धरणातून शिर्डी पर्यंत येणारी पिण्याची पाईपलाईनची पुढे कोपरगांव शहरासाठी आणणेसंदर्भात आवश्यक कारवाई करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. संस्थानच्यावतीने वृत्तपत्रात ई निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेच्या पाणी आरक्षण प्रस्तावासही मान्यता मिळालेली असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादच्या नियामक मंडळाच्या मंजूर ठरावानुसार अध्यक्ष गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी आदेश निर्गमीत केलेले आहेत.

ही वस्तुस्थिती असताना त्यावेळेस राजकीय व्देषापोटी योजने संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु पाणी टंचाईचा व परिस्थितीचा विचार करून उच्च न्यायालयाने ही योजना व्हावी याबाबत सकारात्मक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे सदर योजना साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ व कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी यांनी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केल्यास शिर्डी व कोपरगांव शहरातील नागरिकांचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्याच्या दृष्टीने निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनने शिर्डी व कोपरगाव करिता असलेली संयुक्त पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊ शकते असे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या