Friday, April 26, 2024
Homeनगरनिळवंडे कालव्यांसाठी अतिरिक्त 202 कोटींचा निधी

निळवंडे कालव्यांसाठी अतिरिक्त 202 कोटींचा निधी

संगमनेर |प्रतिनिधी|Sangamner

निळवंडे धरणाचे जनक व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्याच्या कामासाठी सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडून मोठा निधी मिळवला आहे. करोना संकटातही या कालव्यांच्या कामांचा वेग कायम ठेवला असून या कालव्यासाठी नाबार्ड अर्थसहाय्य योजनेतून 202 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळवला असल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.

- Advertisement -

निळवंडे धरण ध्यास पर्व मानून नामदार बाळासाहेब थोरात यांनी हे धरण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले आहे. दुष्काळी भागाला लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच पहिल्या दिवशी या कालव्याच्या कामाला गती दिली. सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देत करोना संकटातही अत्यंत बारकाईने पाठपुरावा करून ही कामे वेगाने सुरू ठेवली. विविध ठिकाणी स्ट्रक्चरलची कामे झाली आहेत. 2022 मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा ध्यास नामदार बाळासाहेब थोरात यांनी ठेवला असून या सर्व कामी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेही मोठे सहकार्य लाभत आहे.

नामदार थोरात हे सलग सहा वर्ष कृषिमंत्री असताना नाबार्डचे विविध अधिकारी व नामदार थोरात यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. या स्नेहसंबंधामुळे नाबार्डच्या टीमने या कालव्याच्या प्रकल्पाची पाहणी दिवाळीपूर्वी केली होती. हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होत आहे हे लक्षात आल्यानंतर नाबार्डच्या टीमने ही समाधान व्यक्त केले होते. आणि त्यानंतर नाबार्ड अर्थसाह्य योजने मधून कालव्यांसाठी तातडीने 202 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे कालव्यांच्या कामाची गती आणखी वाढणार आहे.

सध्या उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याची कामे अत्यंत वेगाने सुरू असून विविध ठिकाणी स्ट्रक्चरल कामे, नद्यांवरील पूल, खोदाई काम सुरू आहे. हा निधी मिळाल्याने या कामांचा वेग आणखी वाढणार आहे. जुन 2021 मध्ये निळवंडे धरणालगतच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक बोगदा नामदार थोरात यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला होता. यानंतर या विविध कामांवर जलसंपदामंत्री व विविध संबंधित अधिकारी यांनीही भेटी दिल्या होत्या. कालव्यांच्या कामाचा ना. थोरात हे सातत्याने दररोज आढावा घेत असून जलद गतीने काम होण्यासाठी सूचना करत आहेत. या सर्व कामांमध्ये अकोले तालुक्यातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभत आहे.

हा निधी मिळाल्याने दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून निळवंडे पाटपाणी कृती समिती व लाभक्षेत्रातील सर्व गावांमधून वतीने नामदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या