Tuesday, April 23, 2024
Homeनगरनिळवंडे कृती समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

निळवंडे कृती समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

निळवंडे पाटपाणी समितीच्या कार्यकर्त्यांची कोपरगाव सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती समितीचे सचिव विठ्ठल घोरपडे यांनी दिली.

- Advertisement -

निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर 2014 साली खडकेवाके येथील तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा व पोलिसांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांवर देखील पोलिसांनी लाठीमार केला होता. यामध्ये समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, नानासाहेब जवरे, गंगाधर गमे, विठ्ठल घोरपडे, दौलत दिघे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला संबंधित केस राहाता येथील न्यायालयात सुरू होती. 2019 ला ही केस कोपरगाव सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली. याठिकाणी दोन वर्षे केस चालल्यानंतर न्यायमूर्ती बोधनकर यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली. समितीच्यावतीने ज्येष्ठ वकील जयंत जोशी यांनी विना मोबदला कामकाज पाहिले. त्यांना व्यंकटेश खिस्ते, योगेश दाबडे यांनी सहकार्य केले. या निर्णयाचे लाभक्षेत्रातून स्वागत करण्यात आले.

गेली पन्नास वर्षांपासून दुष्काळी भागातील शेतकरी निळवंडेच्या पाण्याची वाट पाहत आहे. याच मागणीचे निवेदन देण्यासाठी समितीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या खडकेवाके येथील सभेत उपस्थित होते. मुख्यमंत्री सभेला येण्यापूर्वीच पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यामुळे मोठा गोंधळ होऊन समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. यामध्ये दत्ता भालेराव व दौलत दिघे हे जखमी झाले होते. उलटपक्षी समितीच्या कार्यकर्त्यांवर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर या विषयाला राज्य पातळीवर घेतला गेला. सर्व प्रमुख वृत्त वाहिन्यांनी दखल घेऊन विषयाला गांभीर्याने घेतले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. राजेंद्र सोनवणे, सुखलाल गांगवे, सौरभ शेळके, बाबासाहेब गव्हाणे, विनायक गायकवाड, भाऊसाहेब सोनावणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निळवंडेचे पाणी लवकरच लाभक्षेत्रात येणार आहे. त्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आहे. असे खोटे गुन्हे कितीही दाखल झाले तरी न्याय मिळणारच आहे. लाभक्षेत्रातील जनतेच्या आशीर्वादाने हा निकाल समितीच्या बाजूने लागला आहे.

– विठ्ठल घोरपडे, सचिव, निळवंडे पाटपाणी कृती समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या