Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा

नाशिक विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा

नाशिक । रवींद्र केडिया Nashik

नाशिक विमानतळावरून विमानसेवेने गती घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्गो सेवा दमदारपणे सुरू आहे. नाशिक विमानतळावर असलेल्या मुबलक सुविधांच्या पार्श्वभूमीवर लवकरच विमानतळावर नाईट लँडिंग प्रणाली गतिमान होण्याची चिन्ह दिसू लागल्याने नाशिककरांना नवनवीन शहरांना जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

नाशिकहून इंडिगो विमान कंपनीचे नागपूर, गोवा, हैदराबाद, इंदोर, तसेच अहमदाबादसाठी दोन फेर्‍या सुरू आहेत. या सोबतच स्पाइस जेटने नाशिकहून दिल्लीसाठी सुरू केलेली विमानसेवा सध्या बंद आहे. मात्र मुंबईतील जागेचा तुटवडा लक्षात घेता नाशिकला नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु होण्याची शक्यता वाढलेली आहे. सद्यस्थितीत इंडिगोच्या माध्यमातून चाचपणी केली जात आहे.

नाईट लँडिंगसाठी अडसर

नाईट लँडिंग सेवेसाठी लागणारा सर्विसिंग यंत्रणेचा भाग मोठा आहे. विमानाच्या प्रत्येक भागाची सफाई व त्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र टीम लागत असते. प्रत्येक विमान कंपनी नाईट लॅण्डिंगच्या ठिकाणी स्वतःची टीम उभी करत असते. त्यामुळे जर नाईट लॅण्डिंग करायचे ठरले तर त्यासाठी 200 लोकांचा स्टाफ हा उपलब्ध करावा लागेल. त्यांच्या माध्यमातून पाच ते दहा विमानांची देखभाल केली जाणार आहे. एक अथवा दोन विमानांसाठी ही सुविधा उभी करता येणार नसल्याने विमान कंपन्या त्याचा विचार करीत आहेत. त्यासोबतच विमान पायलट यांना निवासासाठी पंचतारांकित हॉटेलची व्यवस्था करण्याचा एव्हिएशन विभागाचा दंडक आहे. त्या दृष्टीने नियोजन नाशिकला होऊ शकते. त्यासोबतच इतर स्टाफच्या निवासाची व्यवस्था व त्यांचे नियोजन त्या विमान कंपनीला करावे लागते.

इंडिगोची जुळवाजुळव

इंडिगो विमान कंपनी नाईट लँडिंगच्या दृष्टीने विचार करीत असून भविष्यात नाशिकचे विमानतळ नाईट लॅण्डिंगला उपयुक्त ठरेल, असे मत कंपनीद्वारे व्यक्त करण्यात आले आहे.

नाशिकला एमआरओ सेवा

नाशिक विमानतळाच्या सक्षमतेतील महत्वाचा भाग म्हणजे एमआरओ अर्थात विमानाचे देखभाल दुरुस्ती काम सुरू करण्यात आले आहे. संरक्षण विभागाचा अडसरही दूर करण्यात आला असल्याने आता एचएएल या लढाऊ विमान उत्पादक कंपनीच्या कारखान्यात विमानांची देखभाल व दुरुस्ती करणे सोपे होते. त्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली असली तरी अद्याप वेगाने दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. मध्यंतरी या एमआरओच्या माध्यमातून एक हेलिकॅप्टर व एका विमानाची दुरुस्ती करण्यात आली होती.

दोन फ्यूएल स्टेशन

नाशिक विमानतळावर सद्यस्थितीत हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे फ्यूएल स्टेशन आहे. लवकरच या ठिकाणी इंडियन ऑइल देखील आपले फ्युएल स्टेशन उभारणार आहे. सद्यस्थितीत नाशिकहून 72 -78 प्रवासी घेऊन जाणारे विमान सेवेद्वारे प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ही 80 टक्के पेक्षा जास्त आहे. भविष्यात विमानाची क्षमता वाढल्यास कार्गो सेवा ही जास्त सक्षमपणे कार्यान्वित होऊ शकते. त्यातून विमान कंपन्यांना विमान वाहतूक करणे सोयीचे ठरणार आहे.

‘उडान’चे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

‘उडे देश का हर नागरिक’ या संकल्पनेवरून विमानतळ असलेल्या छोट्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने विमान कंपन्यांना सवलत योजना जाहीर केली होती. या सरकारच्या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी बर्‍याच विमान कंपन्यांनी वर्ष दीड वर्षे सेवा देऊन आपल्या सेवा बंद केल्या. ज्या माध्यमातून शासनाकडून मिळणारा निधी लाटता येणे शक्य झाले. विमान कंपन्यांना प्रतिसाद असतानाही विमानसेवा बंद होत आहे.

याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अल्पकाळात शासनाचे लाभ पदरात पाडून नव्या शहरांच्या लाभासाठी विमानसेवा सुरू करणे हा जणू विमान कंपन्यांचा धंदा झाला आहे काय? असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात अनेक कंपन्यांनी नाशिकच्या विमानसेवा बंद केल्या जेव्हा त्यांना प्रतिसाद चांगला मिळत होता. विमान कंपन्यांना सबसिडीच्या कालावधीनंतरही तेवढेच कालावधीसाठी सेवा देणे बंधनकारक केल्यास विमानसेवा कायमस्वरुपी राहतील, असा विश्वास उद्योजक व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या