Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकवर्तमानपत्र सुरु राहणार; प्रार्थना स्थळे आणि शासकीय कार्यालयांबाबत असे आहेत आदेश

वर्तमानपत्र सुरु राहणार; प्रार्थना स्थळे आणि शासकीय कार्यालयांबाबत असे आहेत आदेश

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये येत्या बुधवार (दि १२) दुपारी १२ वाजेपासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, याकाळात वर्तमानपत्र सुरु असतील का?, प्रार्थना स्थळे आणि शासकीय कार्यालयांतील उपस्थिती याबाबत काहीही माहिती त्यांच्याकडून देण्यात आली नाही…

- Advertisement -

कारण, या आदेशात स्पष्टपणे उल्लेख केल्या गेलेल्या बाबी सोडून इतर सर्व निर्बंध वर नमूद शासन अधिसूचनेप्रमाणे सुरु राहतील असे सांगण्यात आले आहे. ज्या आस्थापना सुरु राहण्यासाठी परवानगी आहे तिथे करोना विषयक सर्व प्रतिबंधात्मक बाबींची खबरदारी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. अशाही सूचना यापूर्वी शासकीय कार्यालयांच्या बाबत देण्यात आल्या होत्या. त्यांची जशीच्या तशी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यावेळी वरील मुद्द्यांना अनुसरून जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, शासनाची मूळ अधिसूचना अति विस्तृत आहे व त्यातील काही काही बाबी मध्ये आपण स्थानिक गरज पाहून बदल केलेला आहे. अशा बदल केलेल्या बाबी वगळता बाकीच्या बाबी शासनाच्या अधिसूचने प्रमाणेच नियंत्रित होतील.

उदाहरणार्थ वृत्तपत्र छपाई वितरण, प्रार्थना स्थळे, शासकीय कार्यालये इत्यादी संदर्भात शासनाच्या अधिसूचनेत नमूद तरतुदी कायम राहतील. वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल.

पण विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील. मात्र, याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे लागेल.

शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती २५ टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात.

- Advertisment -

ताज्या बातम्या