Friday, April 26, 2024
Homeनाशिकउपजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिट बंद

उपजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिट बंद

कळवण । Kalvan (प्रतिनिधी)

कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिट हे विजेच्या लपंडावामुळे बंद असल्याने आदिवासी रुग्णांचे हाल होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे कमी वजन, श्वसनाचा त्रास हे व इतर काही आजार असल्यास त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठवले जाते. या विभागाचा वीजपुरवठा सुरळीत करून नवजात शिशु केअर युनिट तात्काळ सुरु करावे, अशी मागणी आदिवासी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

कळवण हा आदिवासी बहुल तालुका आहे. याठिकाणी कळवण, सुरगाणा देवळा, सटाणा येथील आदिवासींची अडचण ओळखून 1995 साली शिवशाही शासनाच्या काळात तत्कालीन माजी आरोग्य मंत्री डॉ. दौलतराव आहेर व माजी मंत्री स्व ए. टी. पवार यांनी पाठपुरावा करून 100 खाटांचे रुग्णालय मंजूर करून सुरूही केले होते.

त्यामुळे येथील सुविधांचा नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा सोबत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नागरिकही लाभ घेत असतात. मात्र कळवण उपजिल्हा रुग्णालयातील महावितरांकडून होणार्‍या वीज पुरवठा होत असलेल्या विजेच्या तारा जीर्ण झाल्या आहेत.

येथील वीज कनेक्शन जुने झाल्याने शॉर्टसर्किटमुळे अनेक संगणक व उपकरण जळाल्याचे समजते. येथे वीज कनेक्शन अभावी सिटीस्कॅनचे मशीन अनेक वर्षांपासून धूळखात पडले आहे. येथिल नवजात शिशु केअर युनिट सुरु होते.

मात्र वीजपुरवठा सुरळीत नसल्याने भंडारा येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथील नवजात शिशु केअर युनिट तात्काळ सुरु करावे अशी मागणी आदिवासी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या