नेवाशाच्या पोलीस निरीक्षकांनी घडवले माणुसकीचे दर्शन

jalgaon-digital
3 Min Read

नेवासा बुद्रुक | Newasa Budruk|मोहन गायकवाड

पोलीस म्हटलं की अनेकांना धडकी भरवणारा शब्द. मात्र काहीं दिवसांपूर्वी नेवासा दुय्यम कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीच्या दोन चिमुकल्या मुलांचा कारागृह परिसरात पोलिसांना सांभाळ करण्याची वेळ आली असून पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलीस दलातील माणुसकी दाखवून दिली आहे.

तालुक्यातील गुन्हेगारीला चपराक असो किंवा चांगले काम नेवासा पोलिसांनी आपल्या चांगल्या कामाचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे अशी एक घटना नेवासा पोलीस ठाण्यात घडली आहे.

वरखेड येथे काहीं दिवसापूर्वी एका 8 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या गुन्ह्याचा अल्पावधीत तपास लागल्यानंतर मुलांच्या आईसह अन्य दोघा आरोपींना दुय्यम कारागृहामध्ये ठेवले. आरोपी महिलेला असलेल्या अन्य दोन मुलांना पंकज (5वर्ष) व दुसरा अमर (10 वर्ष) कटूंबात या दोन्ही चिमुकल्या जीवांचा संभाळ करण्यासाठी दुसरं कोणी नसल्याने त्यांना देखील आपल्या आई व चौकशीसाठी आणलेल्या वडिलांसोबत कारागृहात आणलं. आई कारागृहामध्ये तर सावत्र वडील आणि दोन्ही मुलं काही दिवस कारागृहाबाहेरील मोकळ्या जागेत राहू लागली.

न्यायालय, गुन्हा व कायदा या गोष्टींची जाणीव नसलेल्या या चिमुकल्या मुलांना पोलीस निरीक्षक विजय करे व गार्ड ड्युटी साठी असलेल्या कर्मचार्‍यांकडून माणुसकी च्या नात्याने जेवण, नाष्टा, चहा, बिस्किटे, चॉकलेट, खाऊ, खेळण्यासाठी वस्त भेटू लागल्या तर पोलीस निरीक्षक यांनी झोपण्यासाठी चादर देखील उपलब्ध करून दिल्या. कारागृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत ही दोन्ही मुलं राहात आहेत.

नेवासा कारागृहात पोलिसांचें माणुसकीचे दर्शन बघायला मिळत असल्याने याचीं चर्चा सध्या कारागृह परिसरात व पोलीस ठाण्यात जोरदार चालू आहे.

दिवसभर पोलीस व अन्य कारागृहातील कैद्यांना देखील सध्या या बाल गोपालांचा चांगला विरंगुळा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एरवी शिस्तबद्ध कडक स्वभाव असणार्‍या पोलिसांना देखील मायेचा पाझर फुटला असल्याने या अनोख्या कामाची मोठी चर्चा होत आहे. आरोपी च्या मुलांना माया देऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये माणुसकीचें दर्शन नेवासा पोलिसांनी घडविले आहे.

पोलीस हा देखील माणूस आहे त्याला देखील भावना असतात. दोन्ही मुलांना लवकरच नातेवाईकांकडे सोपविण्यात येईल अन्यथा कायदेशीर बालआश्रमात सुपूर्द करण्यात येईल.

– विजय करे, पोलीस निरीक्षक

आई कारागृहात आहे की घरी याची कणभर देखील जाणीव या दोन्ही चिमुकल्या बाळांना नाही. पोलीस खात्यात असे वाईट प्रसंग खूप वेळा अनुभवले. अशी वाईट वेळ कुणावर येऊ नये.

– राहुल यादव, लॉकअप गार्ड पोलीस नाईक

कारागृहात नोकरी करताना असे वाईट प्रसंग खूप वेळा आले आहे मात्र अशावेळी माणुसकीच्या नात्याने व त्या परिस्थिती प्रमाणे सामोरे जावे लागते. चिमुकल्यांच्या प्रेमाने आम्ही सर्व भावनिक झालो आहे.

– उत्तम रासकर, जेलर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *