नेवासा नगराध्यक्ष निवडीसाठी दाखल तीनही अर्ज वैध

jalgaon-digital
2 Min Read

16 पर्यंत माघारीची मुदत

नेवासा (तालुका वार्ताहर) – नेवाशाच्या नगराध्यक्ष पदासाठी 18 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या अखेरच्या मुदतीपर्यंत एकूण 3 अर्ज दाखल झाले असून हे तीनही अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. अर्ज माघारीची मुदत 16 डिसेंबरपर्यंत आहे.

नेवासा शहर विकास आघाडी कडून दोन तर आमदार गडाख त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून एका उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे.

शहर विकास आघाडीच्या वतीने प्रभाग नंबर दोन मधून सौ शालिनी संजय सुखदान व प्रभाग नंबर सात मधून डॉ. सौ निर्मला सचिन सांगळे यांचे अर्ज आहेत तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने प्रभाग नंबर एक मधून सौ. योगिता सतीश पिंपळे यांचा अर्ज दाखल झालेला आहे. पीठासीन अधिकारी म्हणून श्रीनिवास अर्जुन व नेवासा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी समीर शेख यांनी काम पाहिले. त्यांनी दुपारी केलेल्या छाननीमध्ये तीनही अर्ज वैध ठरल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी संजय सुखदान, नगरसेवक सचिन नागपुरे, नगरसेवक दिनेश व्यवहारे, नगरसेविका सौ. अंबिका इरले, नगरसेविका सौ अर्चना कुर्‍हे उपस्थित होते.

दोन्ही गटांकडे समान संख्याबळ
नेवाशाच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आहे. दोन्ही गटांकडे सध्या समान संख्याबळ आहे. गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नऊ जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांच्या गटाच्या एका जागेवरील सदस्या अपात्र ठरल्या असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शहर विकास आघाडीकडेही आठ सदस्य आहेत. समसमान संख्याबळामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. दगाफटका होऊ नये म्हणून गोळा बेरजेचे राजकारण दोन्ही बाजूकडून होताना दिसत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *