Friday, April 26, 2024
HomeUncategorizedविसरभोळेपणा आता विसरा!

विसरभोळेपणा आता विसरा!

माहितीचा प्रस्फोट झाल्यानंतर एका क्षणात कोणतीही माहिती मिळवण्याचा मार्ग सुलभरित्या उपलब्ध झाला, मात्र तंत्रज्ञानावरील या अवलंबित्त्वामुळे लक्षात ठेवण्याची नैसर्गिक रचना कमकुवत झाली. अलीकडील काळात चटकन न आठवण्याची समस्या सर्वत्र दिसते. मात्र त्यावर तंत्रज्ञानानेच उत्तर शोधले आहे. नवीन तंत्रज्ञान आपल्या मेंदूला कुशाग्र करणार असून आपला मेंदू एकही गोष्ट विसरणार नाही. आपल्या चांगल्या-वाईट आठवणींना ऑन डिमांड पुन्हा उजाळा देऊ शकतो. तसेच वाईट आठवणीदेखील आपल्या मेंदूतून डिलीट करू शकतो.

आपल्याला कधी कधी एखादी गोष्ट पटकन आठवत नाही. ती गोष्ट लवकर लक्षात आली नाही तर आपण अस्वस्थ होतो. मग एखाद्या देशाच्या अध्यक्षाचे नाव असो किंवा गावाचे नाव असो. अनेकदा डोळ्यांसमोर ती गोष्ट येते परंतु त्याचे नाव आठवत नाही. आठवताना आपल्याला बरीच कसरत करावी लागते. आता मात्र आपल्या लक्षात नाही असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. अरे मी तर विसरलो, असे सांगून वेळ मारूनही नेता येणार नाही. कारण शास्त्रज्ञांच्या मदतीने अशा प्रकारच्या विसरभोळेपणावर मात करणारे संशोधन सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात एकही गोष्ट आपण विसरणार नाही, हे निश्चित.

गुगलप्रमाणे एखादा शब्द मेंदूत टाकला की, त्याबाबतच्या आठवणी आपण एखादा पाढा म्हटल्याप्रमाणे समोर येतील. नवीन तंत्रज्ञान आपल्या मेंदूला कुशाग्र करणार असून आपला मेंदू एकही गोष्ट विसरणार नाही. मग नेत्याने दिलेले आश्वासन असो किंवा बायकोचा वाढदिवस. आपल्या चांगल्या-वाईट आठवणींना ऑन डिमांड पुन्हा उजाळा देऊ शकतो. तसेच वाईट आठवणीदेखील आपल्या मेंदूतून डिलीट करू शकतो.

- Advertisement -

संगणकीय भाषेत एक शब्द आहे तो म्हणजे रॅम. रँडम एक्सेस मेमरी. याचा अर्थ संगणकाचा मेंदू किंवा बुद्धी. म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे ते बलस्थान मानले जाते. या माध्यमातून संलग्न असलेल्या हार्डडिस्कमधील मेमरीतून आपल्याला पाहिजे तेव्हा हवी असलेली गोष्ट शोधू शकतो आणि सादर करू शकतो. आपला मेंदूदेखील अनेक चांगल्या-वाईट आठवणी साठवून ठेवत असतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण मेंदूला सूचना देतो आणि ती गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर येते. मग तो मित्राचा मोबाईल नंबर असो किंवा परीक्षेतील प्रश्न असो. परंतु मेंदूच्या स्मरणशक्तीवर सतत हल्ले होत राहतात. त्यामुळे स्मरणशक्ती कालांतराने कमी होऊ लागते आणि विस्मरणाचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे अनेकदा विचार करूनही आपल्याला एखादी गोष्ट आठवत नाही.

तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम

एका नव्या संशोधनानुसार असे लक्षात आले की, आपण गृहीत धरण्याअगोदरच स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. वयस्कर मंडळी विशेषत: साठी ओलांडलेल्या मंडळींची स्मरणशक्ती कमी झालेली असते. अशा मंडळींना एखादी गोष्ट लवकर आठवत नाही. परंतु हा आजार आता वयाच्या 45 वर येऊन पोहोचला आहे. कारण मेंदूवर पडणारा सतत ताण, धावपळीचे युग, सकस आहाराचा अभाव, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, बदलती जीवनशैली, सतत गॅझेटस् वापरणे यामुळे मेंदूवर कमालीचा ताण वाढला आहे. इंटरनेट-मोबाईल या विस्मरणाला जबाबदार आहेत, असे मानले जाते. एखादी गोष्ट आपल्याला आठवयाची असेल तर आपण मेंदूला ताण देण्याऐवजी सर्च इंजिनचा आधार घेतो. त्यामुळे ती गोष्ट हळूहळू विस्मरणात जाऊ लागते. स्मार्टफोनमधील कॉर्न्टट लिस्ट एखाद्या डायरीप्रमाणे काम करते. त्यामुळे आपल्याला घरातील मंडळींचा नंबरही माहीत नसतो. संबंधिताचा क्रमांक आपण नावाने शोधतो. बहुतांश मंडळी डिव्हाईसवर अवलंबून राहत असल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. यातूनच अलझायमरसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यासाठी व्यायाम सांगितला असून योग्य आहार आणि औषधांमुळे काही प्रमाणात या आजाराला लगाम घालू शकतो. एखादी नवीन गोष्ट शिकणेदेखील आपल्याला सहाय्यभूत ठरते. परंतु त्याचा प्रभाव कमी आहे. ज्या वेगाने आपल्यातील विसरभोळेपणा वाढत चालला आहे, त्या तुलनेत स्मरणशक्ती वाढवण्याचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.

ब्रेन रॅम वाढणार

स्मरणशक्ती वाढवण्यासंबंधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून त्याचा विस्तार झाला आहे. संवाद यंत्रणेत यासाठी काही पर्याय समोर आले आहेत. अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली असून ती त्यात सहाय्यकाची भूमिका वठवू शकते. मात्र नवीन तंत्र एक्सटेंडेंड माईंड किंवा अतिरिक्त मेंदू तयार केला जाणार आहे. संगणक किंवा लॅपटॉपमध्ये आपल्याला रॅम वाढवण्याची सुविधा उपलब्ध असते. जेणेकरून डिव्हाईसची क्षमता वाढवू शकतो. मानवी मेंदूत अशाप्रकारची सोय नसते. त्यावर शास्त्रज्ञांनी एक तंत्र शोधून काढले आहे आणि ते मेंदूच्या अशा भागात पोहोचले आहेत की तेथे आपण आठवणींना सहजपणे उजाळा देऊ शकतो. हा भाग एखाद्या रॅमप्रमाणे काम करू शकतो. मेंदूत अशी एखादी गोष्ट इंप्लांट करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून स्मरणशक्तीची ताकद वाढू शकते. गुगल सर्च इंजिन हवी असलेली माहिती लाखो पानातून कसे काय शोधून काढतो तर त्याचे उत्तर आहे कीवर्ड. शास्त्रज्ञदेखील याच तंत्राचा अवलंब करण्याच्या विचारात आहेत. अशाच प्रकारचा कीवर्ड तयार करून तो आपल्या आठवणींच्या खजान्यातून शोधून काढू शकेल. मेंदूची रॅम वाढण्यासाठी आवश्यक असणारी बाब शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या वतीने करण्यात आला आहे. यानुसार मेंदूची स्मरणशक्ती वाढवली जाईल आणि त्यानंतर तंत्राच्या सहाय्याने वेगाने कीवर्ड ओळखण्याच्या क्षमतेला गती दिली जाईल.

संशोधकांचे प्रयत्न

स्मरणशक्तीची ताकद वाढवण्यासाठी उंदरावरच नाही तर बहुतांशी प्रयत्न मानवावरदेखील केले आहेत. त्यांनी मेंदूचा सखोल अभ्यास केला आणि ऐकण्याची, वाचण्याची, पाहण्याची, लक्षात ठेवण्याची प्रक्रिया मेंदूत कशी चालते यावर संशोधन केले. याचा ताळमेळ कसा साधला जातो यावरही संशोधन सुरू आहे. मेंदूतील रिकॉल पॉवर कशी कार्य करते, याचे गुपित जाणून घेतल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. त्यातूनच स्मरणाचे रहस्य उलगडू शकते. संशोधनाच्या माध्यमातून स्मरणशक्तीला अशा स्थितीपर्यंत न्यायचे आहे की, मनुष्यप्राणी एखादी गोष्ट विसरूच शकणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट आठवायची असेल तर ती काही क्षणात आठवू शकेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या