Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! ठाकरे आणि शिंदे गटाला मिळाले 'हे' नाव

मोठी बातमी! ठाकरे आणि शिंदे गटाला मिळाले ‘हे’ नाव

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने ठाकरे- शिंदे गटाला नावे आणि चिन्हं जाहीर केली आहेत. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. तर ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे. ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले आहे. परंतु शिंदे गटाला कोणतंही चिन्ह देण्यात आलं नाही. निवडणूक आयोगाने आज मंगळवारी शिंदे गटाला पुन्हा नविन तीन चिन्ह देण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ‘धगधगती मशाल’हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत निवडणूक चिन्हासाठी नवे पर्याय सादर करण्याचे निर्देशही दिलेत. त्यामुळे शिंदे गटाला कोणते चिन्ह मिळते याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.

ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे दिली होती. यात त्रिशुळ, उगवता सूर्य व धगधगती मशाल यांचा समावेश होता. परंतु त्यातील त्रिशूळ हे चिन्ह आयोगाने रद्दबातल ठरवले. आयोगाने शिंदे गटाचेही गदा हे चिन्ह रद्दबातल ठरवले आहे. दोन्ही चिन्हे धार्मिक असल्याचेही निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे तीन चिन्ह पर्याय म्हणून दिले होते. त्यानंतर आयोगाने त्यांना धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पक्षचिन्हासाठी 3 नवे पर्याय देण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे शिंदे गटाकडून आता कोणते नवीन तीन पर्याय दिले जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाकरे गट हायकोर्टात, आज सुनावणी

केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह अत्यंत घाईगडबडीत गोठवण्यात आले, बाजू मांडण्याचीही संधी दिली गेली नाही, अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटाने केली आहे. याबाबतची सुनावणी आज होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठवले, त्या प्रक्रियेवरच ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान यासंदर्भात शिंदे गटाकडूनही कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या याचिकेवर निर्णय देऊ नये, असे म्हटले आहे.

अंधेरी पोटनिवडणूक महाविकासआघाडीतर्फे लढणार

अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता याच जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक सोबत मिळून लढवणार आहे. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले, अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला परब यांच्यासोबत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि राष्ट्रवादीच्या राखी जाधव देखील उपस्थित होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या