कृषी कायदा : राहुल गांधींच्या नेतृत्वात उद्या राष्ट्रपती भवनावर मोर्चा

नवी दिल्ली –

नव्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उद्या (24 डिसेंबर) राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी

पक्षातील अनेक मोठे नेते आणि खासदार त्यांच्यासोबत असतील. राहुल गांधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन कोटी स्वाक्षर्‍या असणारं निवेदन देणार आहेत.

नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्यस्थी करावी यासाठी काँग्रेसने संपूर्ण देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. दिल्लीच्या वेशीवर गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचं शिष्टमंडळ संसद इमारतीजवळील विजय चौक ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत.

या आंदोलनातून काँग्रेस पुन्हा एकदा कृषी कायद्यावरुन मोदी सरकारला घेऱण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने संसदेतही इतर पक्षांसोबत या कायद्याला विरोध केला आहे. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी निषेध दर्शवण्यासाठी पंजाब आणि हरियाणात ट्रॅक्टर यात्रादेखील काढली होती.

दरम्यान, नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी (22 डिसेंबर) पुन्हा शेतकरी संघटनांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांनी केंद्राला प्रतिसाद दिलेला नाही. केंद्राशी बोलणी करून काही निष्पन्न होत नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.