Friday, April 26, 2024
Homeनगररेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षित काम प्रसाद शुगर व्यवस्थापनाने मार्गी लावले

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षित काम प्रसाद शुगर व्यवस्थापनाने मार्गी लावले

उंबरे |वार्ताहर| Umbare

रेल्वे प्रशासनाला जे जमले नाही ते प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाने प्रत्यक्षात करून दाखविल्याने कामगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाचे कौतूक केले आहे.

- Advertisement -

राहुरी-वांबोरी रोड खडांबे खुर्द गावानजिक सडे रेल्वेचौकी गेटनंबर 36 हे मागील तीन ते चार वर्षापासून रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे. त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग उभारलेला आहे. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेला आहे.

रेल्वे पुलाखालून जाताना पुढच्या दिशेने आलेली गाडीही या दिशेने जाणार्‍या प्रवाशाला अजिबात दिसत नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग हा अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. जागेवर वळण असल्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. पुलाखाली अपघातांची मालिका नेहमीच सुरु असते.

तसेच पावसाळ्यामध्ये कमरेइतके पाणी या पुलाखाली कायमस्वरूपी साचलेले असते. पाणी बाहेर काढण्याची व्यवस्थाही अतिशय कुचकामी असून पुलाच्या लगत कल्हापुरे यांच्या शेतामध्ये एक विहीर खोदली आहे. या पुलाखाली साचलेले पाणी सोडण्याच्या पद्धतीमध्ये जो तीन ते चार फुटाचा व्यास असलेला सिमेंट पाईप आहे, त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के गाळ साचत असल्याने पावसाळा संपूनही एक ते दोन महिने झाले तरी देखील अद्यापपर्यंत रेल्वे प्रशासनाने गाळ काढण्याचे प्रयत्न किंवा पुलाखाली पाणी काढण्याची कोणतीही हालचाल केलेली नाही. म्हणून पुलाखालील पाणी आहे तसेच साचून राहिल्याने पुलाखालून राहुरी-वांबोरी या मार्गाने प्रवास करणार्‍यांची तसेच कृषी विद्यापीठातील कर्मचारी, प्रसाद शुगर कारखान्यातील कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी मार्गावरच अवलंबून असतो. हा रस्ता अतिशय महत्वाचा असून वांबोरी ते राहुरी हे अंतर सर्वात कमी होते. अशी एकंदर परिस्थिती असूनही रेल्वे प्रशासनाने पाणी बाहेर काढण्याची कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत केलेली नव्हती.

प्रसाद शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना झाला. तरी देखील पुला खालील पाण्याच्या कारणास्तव परिपूर्ण आणि तोडणी योग्य असलेला शेतकर्‍यांचा ऊस हा कारखाना हाकेच्या अंतरावर असतानाही वाहतूक करता येत नसल्याने उस शेतातच उभा होता. अशी एकंदर सर्व परिस्थिती असताना प्रसाद शुगर कारखान्याने सर्वांगीण विचार करुन रेल्वे पुलाखाली पाणी काढण्याचा निर्धार केला आणि त्या अनुषंगाने राहुरी नगरपालिकेची अग्निशमन केंद्राची गाडी कारखाना व्यवस्थापनाने स्वखर्चाने बोलावली. दोन- तीन दिवसांत पुलाखालील पाण्याचा निचरा होणारी सिमेंटची पाईपलाईनही अग्निशमनगाडीच्या प्रेशरच्या साह्याने संपूर्ण गाळा साफ केला. पुलाखालील पाणी वाहून विहिरीत जाण्याकरीता मार्ग मोकळा झाल्याने आता पुलाखाली थेंबभरही पाणी साचत नाही किंवा विहिरीमधून पुन्हा पाणी पुलामध्ये येत नाही.

प्रसाद शुगर कारखान्याच्या व्यवस्थापन आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे हे काम यथायोग्य पार पडल्यामुळे परिसरातील सर्व प्रवाशांची तसेच शेतकरी, के.एस. बी. कंपनीचे कामगार, कृषी विद्यापीठ कामगार, विद्यार्थी, दूध व्यावसायिक, आदींची अडचण दूर झाल्यामुळे प्रसाद शुगर व्यवस्थापनाने केलेल्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या