Saturday, April 27, 2024
Homeनाशिकतक्रारदार पाटील यांच्याही चौकशी गरज

तक्रारदार पाटील यांच्याही चौकशी गरज

पंचवटी। वार्ताहर

प्रादेशिक परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी नाशिक पोलिसांचा निलंबित मोटार वाहन निरीक्षक यांच्या तक्रार अर्जावरून तपास सुरू असताना यातील तक्रारदाराच्या विरोधात देखील गेल्या काही वर्षांपासून अनेक तक्रारी असल्याने त्यांचा देखील तपास होणे आवश्यक असल्याचा सूर आवळत आहे.

- Advertisement -

प्रामुख्याने तक्रारदार अधिकारी यांच्यावर पोलीस दप्तरी गुन्हे दाखल आहे. तसेच बेशिस्त वागणुकीमुळे त्यांच्या विरोधात अनेक प्रकारच्या खातेनिहाय चौकश्या सुरू असून याच काळात निलंबन झाल्याने केवळ सूडबुद्धीने परिवहन मंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांवर तथ्यहीन आरोप करीत स्वतःचे पाप लपविण्यासाठी संपूर्ण परिवहन विभागाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप याच विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून होत आहे.

धुळे येथील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र तानाजी पाटील यांनी प्रादेशिक परिवहन विभागातील अनागोंदी कारभार, बदल्या, पदोन्नती यामध्ये मोठा भ्रष्टाचार आणि जातीयवाद होत असल्याची तक्रार नाशिक पोलिसांकडे केली आहे. यात परिवहन मंत्री यांच्यासह वरिष्ठ सहा अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांची चौकशी सुरू आहे. मात्र दुसरीकडे तक्रारदार गजेंद्र पाटील यांची देखील खात्यातील कारकीर्द वादग्रस्त असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पाटील यांच्यावर वरिष्ठांनी अन्याय केला असेल तर निलंबनाची कारवाई नंतरच त्यानी भ्रष्टाचाराचे आणि जातीयवादाचे आरोप का केले ? मुळातच जुलै 2020 मध्ये सहकारी कर्मचार्‍याच्या विरोधात आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर असलेली पाकिटे कार्यालयात ठेवल्याने सफाई कामगार राजाराम दादा गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तपासाअंती गजेंद्र पाटील यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. तसेच कोविड-19 प्रादुर्भावा सारख्या आपत्कालीन परिस्थितीत अवैध प्रवाश्याची वाहतूक करणार्‍या एकही मालवाहतूक वाहनावर कारवाई केली नाही.

कोविड काळात रजेचा अर्ज करून वैद्यकीय रजेबाबत वरिष्ठांची दिशाभूल करणे, प्रशासकीय कामकाजात वारंवार दखल देणे, अडथळा निर्माण करणे, कार्यालयीन पत्रव्यवहारात शिष्टचाराचे पालन न करणे, असे अनेक प्रकारचे ठपके गजेंद्र पाटील यांच्यावर असल्याने खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे. पाटील यांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली असून तपासाअंती सत्य परिस्थिती समोर येईलच मात्र त्यांनी केलेले आरोप कोणत्या आधारे कोणत्या परिस्थितीत केले आणि त्याचा मागचा बोलवता धनी कोण? हे सत्य देखील सर्वांसमोर आले पाहिजे अशी मागणी प्रादेशिक परिवहन विभागात वर्षोनुवर्षे प्रामाणिक सेवा करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांकडून होत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या