Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याNEC : स्टार्टअपच्या उत्कृष्ट 4 प्रकल्पांना पुरस्कार

NEC : स्टार्टअपच्या उत्कृष्ट 4 प्रकल्पांना पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक इंजिनीरिंग क्लस्टरच्या आयडिया स्पार्क 2023-इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 118 प्रस्तावांतून अंंतीम फेरीसाठीच्या 12 प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर चार उत्कृष्ट प्रकल्पांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

- Advertisement -

इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा प्रकल्पाचे उद्घाटन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते दि.22 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. आयडिया स्पार्क-2023 ला नवउद्योजकांचा मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, तेलंगणा आणि तामिळनाडू ही पाच राज्यांतून 16 ते 63 वय गटातील, सातवी ते पीएच.डी. धारक आणि 28 टक्के महिला नवउद्योजिकांनी त्यांच्या संकल्पना सादर केल्या होत्या. त्यात 19 जिल्ह्यांमधून 313 जणांंद्वारे 118 प्रकल्प सहभागी झाले होते.

तपासणीच्या दोन फेर्‍यांच्या मूल्यमापनानंतर पहिल्या टप्पात 25जणांची निवड केली नंतर त्यातून 12 उत्कृष्ट प्रकल्पांंची स्टार्ट अप्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली व त्या 12 जणांनी आपापल्या नव संकल्पना मुख्य निवड समितीसमोर सादर केल्या.सादरीकरणानंतर परिक्षकांनी निवडलेल्या संकल्पनांतून नकुल तिवारी यांच्या नेतृत्वाखालील टीम(प्रथम पुरस्कार रु.50हजार), डॉ. ज्योती रंगोले (द्वितीय पुरस्कार रु.20 हजार) तर निखिल राजपूत यांच्या नेतृत्वाखालील टीम(तृतीय रु.10हजार) रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोबतच इयत्ता 7 वी चा विद्यार्थी अपूर्वा गुप्ता याला विशेष पारितोषिक (रु. 5 हजार) देऊन गौरविण्यात आले.

या मुख्य निवड समितीत एच.डी.एफ.सी. क्रेडीट फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सहसंस्थापक अजय बोहोरा, डब्ल्यूएनएस ग्लोबलचे संचालक मंडळाचे माजी सदस्य वॉरबुर्ग पिंकस, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक नरेंद्र गोलिया, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे माजी अध्यक्ष विक्रम सारडा, एम्पायर फूड्सचे संचालक हेमंत राठी, नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरचे संचालक शरद शाह, अशोक बंग, नरेंद्र बिरार, बलबीरसिंग छाबरा, स्टार्ट अप इको सिस्टिम प्रमुख सचिन पाचोरकर, पारुल दधिच आणि केतन राठी आदींचा सहभाग होता. आयडिया स्पार्कच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या सर्व 12 स्टार्ट अप्सला त्यांच्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवसायात साकारण्यासाठी इन्क्युबेशनला लागणारा संपूर्ण इकोसिस्टिम सपोर्ट नाशिक इंजिनीरिंग क्लस्टर तर्फे देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. माथूर यांनी सांगितले.

नाशिक इंजिनि अरिंग क्लस्टर राबवित असलेल्या आयडिया स्पार्क 2023-इनोव्हेशन चॅलेंजसारख्या उपक्रमांतून तरुण होतकरू नवउद्योजकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळते. नवउद्योजकांनी स्वतःच्या क्षमता ओळखून प्रयोगशीलता व सातत्यपूर्ण सुधारणांद्वारे अपयशाला न घाबरता अथक परिश्रम करावे व दीर्घकालीन यशाच्या दृष्टीने न डगमगता वाटचाल करावी

डॉ. विनायक गोविलकर

इनोव्हेशन करताना धोके पत्करावेच लागतील, अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करीत राहिल्यास निश्चित यश मिळेल. सर्व संकल्पना उल्लेखनीय असून, त्यांना व्यवसायात रूपांतर करण्यासाठी या नवउद्योजकांना नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर सर्वच आघाडीवर पाठबळ देणार आहे.

नरेंद्र गोलिया

नवउद्योजकांसाठी परस्पर सुसंवादाची सुवर्णसंधी असून त्याद्वारे व्यावसायिक वाटचालीत निश्चितच लाभ होईल.

अजय बोहोरा

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे इन्क्युबेटर हे नवउद्योजक व स्टार्ट-अप्सला एमव्हीपी डेव्हलपमेंट, कंपनी फॉर्मेशन, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनापासून ते उत्पादन विकास प्रमाणीकरण , चाचणी ,मार्केट नेटवर्क आणि भांडवल येथपर्यंत संपूर्ण इकोसिस्टिम सपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे.

मनिष कोठारी, अध्यक्ष, नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर

- Advertisment -

ताज्या बातम्या