Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डीत राष्ट्रवादी पदाधिकार्‍याची कार अडवून 12 हजारांची लूट

शिर्डीत राष्ट्रवादी पदाधिकार्‍याची कार अडवून 12 हजारांची लूट

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात शनिवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष राहुल कुलकर्णी यांची अज्ञात पाच ते सात इसमांनी कार अडवून मारहाण करत 12 हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली आहे. यावेळी हल्ल्यात कुलकर्णी हे किरकोळ जखमी झाले असून हल्लेखोरांंविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत राहुल कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. 23 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील कामकाज आटोपून शिर्डीकडे येत असताना शहरातील लक्ष्मीनगर येथे सात अज्ञात इसमांनी गाडी अडवून रूमसाठी विचारपूस केली. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मी शिर्डीतीलच आहे, असे सांगितल्यानंतर त्यांनी दादागिरी करून अरेरावी केली व माझ्याशी झटापट करून मारहाण करत जखमी केले आणि माझ्याजवळील असलेले खिशातील रोख रक्कम रुपये 12 हजार हिसकावून घेतले.

त्यानंतर तू जर पोलीस ठाण्यात गेला तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली. अज्ञात इसमांमध्ये माझ्या ओळखीचा रुपेश वाडेकर व निवृत्ती वाडेकर या दोघांचा समावेश होता. त्यानंतर मी स्वत:ला कसाबसा सावरून जखमी अवस्थेत पोलीस ठाणे गाठून सदरील घडलेला प्रकार ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार आर. टी. मोरे यांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती, परंतु तोपर्यंत सदर इसम फरार झाले असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवर झालेल्या हल्ल्याबाबत शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. शिर्डी पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना रस्त्यावर लुटमार होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून मंदिर सुरू झाल्यानंतर शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वरती काढले आहे. शिर्डी पोलिसांसमोर गुन्हेगारीला आळा बसविणे मोठे आव्हान आहे. शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन हल्लेखोरांना तसेच वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान फरार आरोपींचा शिर्डी पोलीस शोध घेत घेत असून रुपेश वाडेकर व निवृत्ती वाडेकर यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवी कलम 323, 427, 506 अन्वये गुन्हा नोंदविला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या