Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयशिर्डी राष्ट्रवादीला, पंढरपूर काँग्रेसकडे?

शिर्डी राष्ट्रवादीला, पंढरपूर काँग्रेसकडे?

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या शासकीय महामंडळ वाटपास अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंगळवारी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधानसभेतील संख्याबळानुसार महामंडळ वाटपाचे सूत्र निश्चित झाले.

- Advertisement -

त्यानुसार मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थान शिवसेनेकडेच राहणार असून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा देवस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाल्याचे समजते.. शिर्डी देवस्थानवर काँग्रेसने हक्क सांगितला आहे. मात्र, राष्ट्रवादी शिर्डीसाठी आग्रही आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. बैठकीनंतर बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महामंडळ वाटपसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली, लवकरच तीन पक्षांना महामंडळाचे वाटप होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणे वाटप होईल. छोट्या घटक पक्षांना यात वाटा दिला जाणार आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. काही महामंडळाचा निर्णय झाला आहे. काहींवर मतभेद आहेत. मात्र मुख्यमंत्री त्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब करतील, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

आघाडी सरकारच्या स्थैर्याबद्दल सातत्याने चर्चा सुरू असतानाच महामंडळ वाटपाचा प्रश्न मार्गी लावून महाविकास आघाडीला बळ देण्याचा प्रयत्न आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या, विधानसभा उमेदवारी न मिळालेल्या नाराज नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला महामंडळाचा मोठा आधार असतो. राज्यात ५० पेक्षा अधिक महामंडळे आहेत. या महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून नेते, कार्यकर्ते यांची वर्णी लावली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या