Thursday, April 25, 2024
Homeनगरखते आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

खते आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने केलेल्या खत व इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस) दरवाढी निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आले व केंद्र सरकारने इंधन व खतांची केलेली दरवाढ तातडीने कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रशांत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, किसनराव लोटके, अशोकराव बाबर, केशवराव बेरड, सीताराम काकडे, सुहास कासार, गहिनीनाथ दरेकर, गजेंद्र भांडवलकर, वैभव मस्के, अक्षय भिंगारदिवे, आरिफ पटेल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे.

- Advertisement -

इंधन दरवाढीची झळ मध्यमवर्ग, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे करोना महामारीशी सामना करत असताना दुसरीकडे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार वारंवार महागाईमध्ये वाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करण्याचे काम करत आहे. भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले असताना केंद्र सरकारने सोमवारी सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.

युवक राष्ट्रवादीचे जिल्हाभर आंदोलन : कपिल पवार

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवकच्यावतीने जिल्हाभर पेट्रोलपंपाच्याठिकाणी आंदोलने करण्यात आल्याची माहिती युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिली. संगमनेर तालुक्यात स्वत: पवार हे आंदोलनात सहभागी झाले. यावेळी तालुका अध्यक्ष अक्षय भालेराव व शहराध्यक्ष राहूल वर्पे उपस्थित होते. राहाता आणि शिर्डी शहर युवक राष्ट्रवादीने मोटारसायकल ढकलून अांदोलन केले. पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर यांनी फुले देऊन आंदोलन केले. कोपरगाव शहरात शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी कार्यकर्त्यांसह इंधन दरवाढीच्या विरोधात मोटारसायकल ढकलून व फुले वाटून आंदोलन केले. तर अकोले तालुका व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तालुका अध्यक्ष रवींद्र मालुंजकर व शहराध्यक्ष अमित नाईकवाडी यांनी आंदोलन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या