Wednesday, April 24, 2024
Homeनगरकर्जतमध्ये आ. रोहित पवारांना अजून एक धक्का

कर्जतमध्ये आ. रोहित पवारांना अजून एक धक्का

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

आमदार रोहित पवार यांना सातत्याने राजकीय धक्के बसत आहेत. कर्जत नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके यांनी समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे, त्यांची कर्जत तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

बापूसाहेब नेटके यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केल्याने त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार आहे. श्री नेटके हे मागील पंचायत समितीमध्ये उपसभापती होते. या काळामध्ये त्यांनी चांगला जनसंपर्क तालुक्यामध्ये केलेला आहे. एक चाणक्य राजकारणी अशी त्यांची तालुक्यात ओळख आहे. भाजपचे एकमेव सदस्य असताना देखील त्यांनी त्यावेळी पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवत भाजपचा झेंडा पंचायत समितीवर फडकावला होता.

प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना नेटके म्हाणाले, आपण पूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये होतो. आमदार रोहित पवार यांच्याकडे पाहूनच आणि मतदारसंघातील विकास कामे मोठ्या प्रमाणात होतील या अपेक्षेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु अडीच वर्षांमध्ये माझा मोठा भ्रमनिरास झाला. मान सन्मान कधी मिळाला नाही, आणि रोहित पवार यांची काम करण्याची पद्धत म्हणजे कार्यकर्त्यांची खच्चीकरण करणारी आहे.प्रत्येक जण आपल्या मुठीमध्ये राहिला पाहिजे अशा पद्धतीची कार्यपद्धती मला आवडली नाही. त्याठिकाणी केवळ गर्दी आहे आणि कार्यकर्त्यांना देखील पुरेसा वेळ दिला जात नाही, कामे सांगितली तर होत नव्हती, यामुळे कामे घेऊन येणार्‍या नागरिकांना काय उत्तर द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला होता.

यावेळी अहमदनगर दक्षिणचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले हे उपस्थित होते. यावेळी कर्जत तालुका प्रमुखपदी बापूसाहेब प्रभाकर नेटके व तालुका उपप्रमुख म्हणून सुभाष अंबादास धस यांची निवड जाहीर करण्यात आली.

आ. पवारांच्या कोंडीचा प्रयत्न

प्रा. शिंदे आमदार झाल्यानंतर त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आपले शिलेदार पुन्हा माघारी घेण्यास सुरूवात केली आहे. तसे काही प्रवेश यापूर्वी झाले आहेत. मात्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षही पवारांच्या पाठी हात धुऊन लागला असून दोन्ही पक्ष आ. पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी अगामी निवडणुका पवारांसाठी अवघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या