Thursday, April 25, 2024
Homeनगरराष्ट्रवादी - काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जागा वाटपाचा ठरेना फॉर्म्युला

राष्ट्रवादी – काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जागा वाटपाचा ठरेना फॉर्म्युला

कर्जत |वार्ताहर| Karjat

कर्जत नगरपंचायतची निवडणूक मार्च महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- Advertisement -

भाजपने तर काही प्रभागांमध्ये आपले उमेदवार देखील माझी मंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर केले आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांच्या जागा वाटपाचा घोळ कायम आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या; परंतु कोणत्या पक्षाला किती जागा याचा फॉर्म्युला अजूनही तयार होण्यास विलंब लागत आहे.

नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार विद्यमान नगरसेवक आहेत व एक पुरस्कृत नगरसेवक विजयी झाला आहे. तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार पालिकेमध्ये नाही आणि हेच जागा वाटपाचे अडथळ्याचे मुख्य कारण होत आहे. शहरांमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद चांगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र इतर पक्षातील व काही चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तींना पक्षामध्ये घेऊन सर्व प्रभागांमध्ये आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याचे दिसत आहे. आगामी नगरपालिकेची निवडणूक आ. पवार यांच्या नावावरच लढवली जाणार हे उघड आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याठिकाणी स्वबळावर सत्ता आणण्याचे मनसुबे दिसून येत आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आ. पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. यावेळी आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी थेट काँग्रेस पक्षाला तुमची किती जागांची मागणी आहे, अशी विचारणा केली आहे. यावर काँग्रेस पक्षाच्या उपस्थित नेत्यांनी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.

या कालावधीमध्ये काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस आपणास किती जागा देऊ शकते. याचा अंदाज बांधत आहे. राष्ट्रवादीबरोबर युती केल्यास काय फायदा होईल आणि न केल्यास नुकसान होईल का? याची चाचपणी काँग्रेस पक्षाचे नेते करताना दिसून येत आहेत. एवढे मात्र खरे की, काँग्रेस पक्षाला यावेळी याठिकाणी नमते धोरण घ्यावे लागेल, असे चिन्ह दिसून येत आहे.

जर काँग्रेसच्या नेत्यांनी नमते धोरण घेतले नाही तर कदाचित काँग्रेस व राष्ट्रवादीची युती या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी मिळेल तेवढ्या जागेवर समाधान मानण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळामध्ये जिल्हा सहकारी बँकेसह इतरही निवडणुका आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवूनच काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी नगरपंचायत संदर्भात जागा वाटपाची बोलणी करतील, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या